Chiplun : चिपळूणमध्ये चतुरंगचा नाट्य महोत्सव ठरला ‘हाऊसफुल्ल’

चिपळूण : चतुरंग प्रतिष्ठानने चिपळूणमध्ये भरवलेल्या संगीत नाट्य महोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि येथील संगीत नाट्यप्रेमी नाट्यसंगीतात अक्षरशः न्हाऊन निघाले. वन्स मोअर आणि टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद देत महोत्सवाचे तनिही दिवस हाऊसफुल्ल झाले व दरवर्षी चतुरंगने हा नाट्य महोत्सव भरवावा अशी मागणीदेखील नाट्यप्रेमींनी केली. या निमित्ताने अनेक वर्षे खंडित झालेली परंपरा चतुरंगच्या माध्यमातून चिपळुणात सुरू झाली.

चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात दि. ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान संगीत नाट्य महोत्सव झाला. या महोत्सवाला चार पिढ्यांनी प्रतिसाद दिला. प्रेक्षागृहात आबालवृद्धांसह तरुण आणि चिमुकले देखील संगीत नाटक पाहायला आले होते. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र २००५ च्या महापुरापासून बंद होते. सुमारे १८ वर्षे चिपळुणातील ही सांस्कृतिक वास्तू पडीक होती; मात्र आता पुन्हा एकदा नव्याने येथील सांस्कृतिक चळवळीला बळ मिळत आहे या पार्श्वभूमीवर चतुरंग प्रतिष्ठानने या हंगामातील पहिलाच नाट्य महोत्सव यशस्वी करून दाखविला आहे. चिपळूणवासीयांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली. या नाट्य महोत्सवात खंडित झालेली क प्रथा नव्याने सुरू झाली. प्रमुख पाहुणे किंवा नाट्यकर्मीच्या हस्ते तिसरी घंटा देण्याची प्रथा चतुरंगने सुरू केली.

पहिल्या दिवशी राज्य नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे प्रथम व एकदा द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या वाघांबेच्या (मुंबई) परस्पर सहायक मंडळाने सं. बावनखणी या नाटकाचा अप्रतिम प्रयोग सादर केला आणि लोकांची मने जिंकली. ग्रामीण भागातील नाट्य कलाकार असताना देखील व्यावसायिक नाटक़ कंपनीच्या तोडीस तोड हा प्रयोग झाला तर दि. ५ रोजी ‘जय जय गौरीशंकर’ या प्रयोगाला तर उपस्थित लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. सं. बावनखणीमध्ये पेशवेकालीन नर्तकी आणि त्यांना मिळणारा मान या विषयावर हे नाट्य रंगले. तालासुरात चाललेले हे नाटक सरस ठरले. दुसऱ्या दिवशी पार्वतीचा गर्व हरण करणारा प्रसंग ‘जय जय गौरीशंकर’ नाटक़ातून सांगण्यात आला. ही दोन्ही अजरामर नाटके प्रेक्षकांनी उचलून धरली. रंगमंचावरील कैलास पर्वत आणि पाऊस पाडण्याचा प्रसंग प्रेक्षकांना भावून गेले.

या शिवाय या दोन्ही संगीत नाटकातील कलाकारांनी आपल्या अभिनयाचे पैलू पाडले. गायन, वादन, संगीत, नेपथ्य, प्रकाश अशा सर्वच बाजूंनी ही दोन्ही नाटके उजवी ठरली. संगीत नाटक़ामध्ये गायकाला विशेष महत्त्व असते. त्याप्रमाणे नाटकातील गायकांनी देखील आपला कस पणाला लावून गायन केले आणि रसिकांच्या टाळ्यावर टाळ्या मिळविल्या.

तिसऱ्या दिवशी संगीत नाटकाचीच गोष्ट सांगणारे गोष्ट संयुक्त मानापमानाची हे बहारदार संगीत नाटक झाले. या नाटकाने उपस्थित श्रोत्यांना स्वातंत्र्यपूर्व काळात नेले. अजिंक्य पोंक्षे, ऋषिकेश वांबुरकर, ओंकार प्रभूघाटे यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. या शिवाय आधीच्या दोन नाटकातील विशारद गुरव, सौ. देवश्री शहाणे, गुरुप्रसाद आचार्य, समीक्षा मुकादम या कलाकारांनी मंत्रमुग्ध गायन करून उपस्थितांना खिळवून ठेवले. रसिकांनी वन्स मोअर आणि टाळ्यांचा प्रतिसाद दिला. सलग तीन दिवस चिपळूणवासीय संगीत नाटक़ांच्या रंगात न्हाऊन निघाले. चतुरंग प्रतिष्ठानने तीनही दिवस हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळविला. त्यामुळे दरवर्षी असा संगीत नाट्य महोत्सव भरविला जावा, अशी मागणी नाट्यरसिकांनी आवर्जून केली. चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर, अजित आगवेकर व टीमने संयोजन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 08/Oct/2025