Ladki Bahin Yojana: eKYC नाही तर लाडक्या बहिणींना दिवाळीचा हप्ता मिळणार नाही? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट..

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण योजना’ आता eKYC च्या कचाट्यात अडकली आहे. रात्रभर जागून लाडक्या बहिणी eKYC करत आहेत. मात्र OTP एररची अडचण अजूनही मिटलेली नाही. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या तांत्रिक अडचणीवर काम सुरू असल्याचे सांगितले आहे.

दोन महिन्यांची मुदत असल्यामुळे eKYC करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की eKYC एररमुळे प्रक्रिया पूर्ण न झाल्यास सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही का?

सरकारने स्पष्ट केले आहे की eKYC साठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे पात्र बहिणींना या दोन महिन्यांचे हप्ते मिळायला हवेत. तसेच eKYC न झाल्यास सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे थांबवले जातील, असा कोणताही शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

म्हणजेच, पैसे थांबवायचे असतील तर ते नोव्हेंबरपासून थांबवले जाऊ शकतात. कारण या दोन महिन्यांत सरकार eKYC द्वारे पडताळणी करणार आहे. सध्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता eKYC अभावी थांबवण्यात येईल, असा कोणताही निर्णय झालेला नाही.

गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात सरकारने दोन हप्ते अ‍ॅडव्हान्समध्ये दिले होते. चालू महिन्याचा आणि दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता. त्यामुळे लाडक्या बहिणींना ४५०० रुपये मिळाले होते, आणि दिवाळी गोड झाली होती. कारण त्यावेळी विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या.

यंदाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने सरकार लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही, अशी शक्यता आहे. तसेच तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सरकार eKYC साठी मुदतवाढ देऊ शकते.

ई-KYC कशी कराल?

1. लाभार्थी महिलांनी मोबाईल किंवा संगणकावर [ladkibahin.maharashtra.gov.in](https://ladkibahin.maharashtra.gov.in) या पोर्टलला भेट द्यावी.

2. लॉगिन केल्यावर eKYC प्रक्रिया पूर्ण करा हा पर्याय दिसेल – त्यावर .

3. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.

4. आधार प्रमाणीकरणासाठी मंजुरी द्या आणि Send OTP वर .

5. आधारशी लिंक मोबाईलवर आलेला OTP टाका आणि Submit करा.

6. त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक, कॅप्चा आणि OTP नमूद करा.

7. पुढे लाभार्थी लाडकी बहिणीचा जात प्रवर्ग निवडा आणि आवश्यक प्रमाणपत्रांची पुष्टी करा.

8. सर्व माहिती तपासून Submit बटणावर .

9. eKYC पडताळणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असा संदेश स्क्रीनवर दिसेल.”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे eKYC करताना OTP संदर्भात काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. महिला व बालविकास विभागाने या बाबीची गांभीर्याने दखल घेतली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून उपाययोजना सुरू आहेत. लवकरच ही अडचण दूर होऊन eKYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होईल, याची मी सर्व लाडक्या बहिणींना खात्री देते.” – अदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 08-10-2025