रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालय, निवखोल, राजिवडा, आंबेशेत या भागांतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेकडे रस्त्यांच्या तातडीने डांबरीकरण व दुरुस्तीची मागणी करणारे निवेदन काल सादर करण्यात आले.
नगरपालिकेने हॉट मिक्स पद्धतीने निवखोल घाटीसह केलेला उत्तम रस्ता पावसाळ्यानंतर अत्यंत खराब अवस्थेमध्ये आहे. गणेशोत्सवादरम्यान भरलेले खड्डे अत्यंत अयोग्य पद्धतीने भरले गेले असल्याने खड्यांच्या जागी आत्ता उंचवटे व चर तयार झाले आहेत. यामध्ये कामावर योग्य अनुभवी देखरेख नसल्यामुळे सद्हेतूने केलेल्या दुरुस्तीनंतर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर वाहतुकीची तीव्र समस्या असून, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
निवेदनाद्वारे पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची तातडीने डांबरीकरणाची कामे हाती घ्यावीत, नाल्यांची साफसफाई करावी, गटारांचे व्यवस्थापन करावे, उत्तारावरील दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली. मागण्यांचे निवेदन गणेश भारती, दीपक सुर्वे, राजीव लिमये, आनंद ते लिमये, संतोष चव्हाण व प्रवीण वायंगणकर, मिलिंद हतफळे, अख्तर शिरगावकर, सुहेल मुकादम आदींसह ग्रामस्थांनी सादर केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 08/Oct/2025














