रत्नागिरी : कोल्ड्रिफ सिरप, बॅच नं. एसआर १३ या कफ सिरपमध्ये रासायनिक पदार्थ आढळल्यामुळे त्याचा वापर नागरिकांनी तत्काळ थांबवावा.
जर हे औषध कोणाकडे उपलब्ध असेल तर ते जवळच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयास त्वरित कळवावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त (औषधे) शशिकांत यादव यांनी केले आहे.
मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये कफ सिरप औषधाच्या वापरामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता यांनी तत्काळ या औषधाचा वापर थांबवावा. जर हे औषध कोणाकडे उपलब्ध असेल तर ते जवळच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयास त्वरित कळवावे किंवा ई-मेल: acfdartn२०१९@gmail.com च्या माध्यमातून थेट अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी. या औषधाचा राज्यात वितरण झालेल्या साठ्याबाबत कारवाई घेण्याकरिता अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य येथील अधिकारी तमिळनाडू, औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधून या उत्पादनाच्या महाराष्ट्रातील वितरणाचा मागोवा घेत आहेत. राज्यातील विक्रेते, वितरक आणि रुग्णालये यांना या औषधाच्या समूह क्रमांकाचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता तो सर्व साठा गोठवावा, अशा सूचना सर्व औषध निरीक्षक व साहाय्यक आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 08-10-2025














