Mandangad : शेनाळे घाटातील ‘त्या’ वळणाकडे दुर्लक्ष

मंडणगड : आंबडवे महाड-राजेवाडी महामार्गावरील शेनाळे घाटातील चिंचाळी धरणाजवळील तीव्र वळण धोक्याचे ठरत असून, ५ ऑक्टोबरला या ठिकाणी झालेल्या गंभीर अपघाताने पुन्हा एकदा या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. अपघातग्रस्त मोटार रस्त्यालगतच्या बॅरिकेडस्ला आदळल्याने चालक आणि प्रवासी बचावले.

स्थानिक नागरिक आणि प्रवासी यांनी या वळणाबाबत महामार्ग प्राधिकरणाला वारंवार सूचना देऊनही काहीही सुधारणा करण्यात आलेली नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. अपघातानंतरही प्राधिकरणाला धडा न मिळाल्यास एखाद्या गंभीर जीवितहानीनंतरच उपाययोजना होतील का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. आंबडवे राजेवाडी मार्गाचे नूतनीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून, पाच मीटर रुंदीच्या जुन्या डांबरी रस्त्याऐवजी आता दहा मीटर रुंदीचा काँक्रिट रस्ता बनवला जात आहे; मात्र शेनाळे घाटात, विशेषतः चिंचाळी धरणाजवळील मोठे वळण, प्राधिकरणाने नियोजनबद्ध रितीने रुंद न केल्याने ते तसे अरुंदच राहिले आहे. अपघातानंतर नागरिकांनी आणि वाहनचालकांनी प्राधिकरणाला तातडीने या वळणावर रुंदीकरण करून वळणाची तीव्रता कमी करण्याची मागणी केली आहे.

शेनाळे चिंचाळी घाटातील या वळणावर एकावेळी दोन वाहनांना जाणे फार कठीण जाते. अनोळखी वाहनचालकांना वळणाच्या अरुंदपणाचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता कायम असते. या ठिकाणी तातडीने रुंदीकरण करून वळणाची तीव्रता कमी करणे गरजेचे आहे- कौस्तुभ भिंगार्डे, मंडणगड

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 08/Oct/2025