चिपळूण : तालुक्यातील खेर्डी येथील प्रशांत संभाजी दाभोळकर यांनी कोल्हापूर येथे झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत ‘आयर्न मॅन’ हा प्रतिष्ठेचा किताब मिळवला आहे. देश-विदेशातील ३०० हून अधिक खेळाडू यात सहभागी झाले होते.
अत्यंत कठीण अशी ही ट्रायथलॉन स्पर्धा म्हणजे स्विमिंग (१.९ किमी), सायकलिंग (९० किमी) आणि धावणे (२१.१० किमी) असा त्रिसंघर्षात्मक प्रकार असतो. ही स्पर्धा १० तासांच्या आत पूर्ण करणे ही अट असते; मात्र प्रशांत दाभोळकर यांनी ही अवघड शर्यत केवळ ७ तास ४६ मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करत खेर्डीचा आणि संपूर्ण चिपळूणचा अभिमान वाढवला आहे. प्रशांत दाभोळकर हे खेर्डी गावचेच रहिवासी असून, माजी सरपंच दशरथ दाभोळकर यांचे बंधू आहेत.
सुरुवातीला त्यांनी कराटे प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. ते स्वतः ब्लॅक बेल्ट विजेते असून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. शरीर सशक्त ठेवण्याची आवड असल्यामुळे त्यांनी विविध खेळात यश मिळवले. ‘आयर्न मॅन’ बनण्याचे स्वप्न त्यांनी गेल्या वर्षीच पाहिले होते. परंतु, त्यावेळी किरकोळ दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होता आले नाही; मात्र त्यांनी हार मानली नाही.
दुखापतीतून सावरल्यानंतर त्यांनी दैनंदिन सहा तास सराव करण्याचा संकल्प केला. वाशिष्टी नदी आणि चिपळूण नगर परिषदेच्या जलतरण तलावात पोहण्याचा विशेष सराव केला. धावणे ही पूर्वीपासून त्यांची ताकद होतीच. परंतु स्पर्धेसाठी त्यांनी दररोज ५० किमी सायकलिंग करणे सुरू ठेवले. स्पर्धेपूर्वीचा संपूर्ण वर्षभराचा कठोर आणि शिस्तबद्ध सराव, आहार, वेळेचे नियोजन, तसेच कुटुंब आणि चिपळूण सायकलिंग क्लब यांचे सातत्यपूर्ण पाठबळ यामुळे त्यांनी ही कामगिरी साध्य केली. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर त्यांचा चारवेळा आयर्न मॅन किताब मिळवलेले प्रसिद्ध ट्रायथलॉनपटू गोंदू गुप्ते कृष्णा यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 08/Oct/2025














