Ratnagiri : संगम चव्हाण याची राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

जाकादेवी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच जयकिसान क्रीडा मंडळ वडणगे येथे विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा पार झाल्या. या स्पर्धेत मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुंडमधील संगम सुयोग चव्हाण या विद्यार्थ्यांची संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागीय संघात निवड झाली आहे.

या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामधून सुवर्णपदक विजेते सुमारे ३५० खेळाडू सहभागी झाले होते. या विभागीय स्पर्धेसाठी रत्नागिरी तालुक्यातील बळीराम परकर विद्यालयाच्या मालगुंडचे खेळाडू संगम चव्हाण, सोहम यादव, शुभ्रा रामाणी, अन्वी साळवी या खेळाडूंनी १४ वर्षे वयोगटामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सोहम यादव याने रौप्य पदक पटकावले आहे.

तसेच संगम चव्हाण याने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत सुवर्ण पदक पटकावले व त्याची कोल्हापूर विभागीय संघामध्ये निवड झाली आहे. १३ व १४ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठभ कोल्हापूर विभागाचे प्रशालेच्या वतीने प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक विजेते खेळाडूंची निवड नागालँड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 08/Oct/2025