चिपळूण : घंटागाडीने कचरा उचलला जात असतानाही अनेक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने आता खेर्डी ग्रामपंचायतीने त्याला चाप लावण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्याला आता १ हजार रुपये दंड केला जाणार आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्याचा फोटो काढून देणाऱ्याला ५०० रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णयही खेर्डी ग्रामपंचायतीने घेतला आहे.
तालुक्यात सर्वाधिक श्रीमंत ग्रामपंचायत असलेल्या खेर्डी गावात गेल्या काही वर्षापासून घंटागाडीचा उपक्रम राबवला जात आहे. या सुविधेमुळे गावातील अंतर्गत तसेच सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य अथवा ढीग दिसत नाहीत. गावात घंटागाडीची सुविधा असतानाही काही सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याबाबत ग्रामपंचायतीकडून वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत जनजागृतीही केली आहे. मात्र तरीही काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळत आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. सार्वजनिक ठिकाणी जो कचरा टाकेल, त्याला १ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. कचरा टाकणाऱ्याचा कोणी फोटो काढून दिल्यास त्याला ५०० रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे.
खेर्डीच्या ग्रामसभेत यावर चर्चा करून तसा निर्णय घेण्यात आला. सोशल मीडिया तसेच जनजागृती फलकाद्वारे याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली जात आहे. गावात नियमित स्वच्छता राहण्यासाठी प्रत्येक वाडीत सामूहिक स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. याकामी बचत गटाच्या महिलांनी मोठा पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून स्वच्छता अभियान आणि दंडात्मक कारवाईच्या बडग्यामुळे गावात नियमित स्वच्छता राहण्यास मदत होणार असल्याचा विश्वास सरपंच सुगंधा माळी, उपसरपंच अभिजीत खताते व सर्व सदस्यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 08/Oct/2025














