Rajapur Sakhari Nate Bandar : गाळामुळे साखरी-नाटे बंदराचे अस्तित्व धोक्यात

राजापूर : तालुक्यातील साखरी-नाटे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मासेमारी बंदर मानले जाते. मात्र, गेल्या काही वर्षापासून जैतापूर सुरू बन आणि घेरा-यशवंतगड परिसरातील निमुळत्या खाडीच्या प्रदेशात प्रचंड प्रमाणावर गाळ साचल्याने या बंदरात शिरताना मच्छीमारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे बंदर आता गाळाने भरल्याने या बंदराच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.

मासेमारी करून परतताना बंदराकडे शिरताना बोटींचा वेग मंदावतो आणि गाळात अडकण्याच्या घटना वारंवार घडतात. विशेषतः ओहोटीच्या काळात ही समस्या अधिक तीव्र होते. अनेकदा बोटी खाडीतच अडकून बसतात. त्यामुळे मच्छीमारांना तासन् तास प्रतीक्षा करावी लागते. यादरम्यान बोटीचे यांत्रिक नुकसान होतेच, शिवाय मोठ्या प्रमाणावर मासळीही खराब होऊन आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

साखरी-नाटे बंदरातून होणारी मासळी विक्री केवळ स्थानिकच नव्हे तर जिल्हा व राज्याच्या बाजारपेठेसाठी महत्त्वाची आहे. मात्र, गाळाच्या समस्येमुळे मच्छीमारांचा परतीचा प्रवास धोकादायक ठरत आहे. ‘समुद्रात जाऊन जीव धोक्यात घालून मासेमारी केली, तरी परतताना बंदरात शिरणे हेच संकट ठरत आहे,’ असे स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे बंदर असताना येथे वारंवार बोटी अडकण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शासनाने तातडीने गाळ उपशाचे काम हाती घेतले पाहिजे. अन्यथा मच्छीमारांची उपजीविका धोक्यात येईल-वजूद बेबजी, माजी चेअरमन, साखरी-नाटे मच्छीमार सोसायटी, राजापूर.

लक्ष दिले नाही तर कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम
आम्ही समुद्रात जाऊन जीव धोक्यात घालून काम करतो; परंतु गाळामुळे रोजच्या रोज संकट ओढवते. जर शासनाने लक्ष दिले नाही, तर येत्या काही वर्षांत साखरी-नाटे बंदराची मच्छीमारी क्षमता कमी होईल आणि जिल्ह्यातील हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होईल, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 08/Oct/2025