रत्नागिरी : जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस, अतिवृष्टी आदी कारणांमुळे एसटीचे १२ हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास रद्द करावा लागला.
त्यामुळे एसटी विभागाचे सुमारे १० लाखांहून अधिक नुकसान झाले. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात एसटीचे किरकोळ अपघातही झाले.
कोकणात पाऊस मुसळधार पडतो. या काळात एसटी सेवा बंद होत नाही, गावागावांत रस्ते असल्याने वाहतूक सुरू असते. मे, जून, जुलैसह सप्टेंबर महिन्यातील मुसळधार पावसात ही एसटी रस्त्यावर धावत होती. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार ते पाच जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे काही एसटी रद्द कराव्या लागल्या. सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठी हजेरी लावली होती. रस्त्यावर पडलेले खड्डे, पावसाचे पाणी साचून झालेला चिखल, निकामी साइडपट्यांमध्ये एसटीचे चाक अडकून किंवा आपटून अपघात झाले. कित्येक गाड्यांचा बाजूच्या डोंगर, कडा किंवा झाडांना धक्का बसला. यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले. जुलै, ऑगस्ट, महिन्यात पूरपरिस्थितीमुळे एसटी गाड्या रद्द कराव्या लागल्यामुळे लाखोंचा नुकसान रत्नागिरी विभागाचे झाले आहे.
एसटी १५ गाड्या भंगारात
पावसाळ्यात कित्येक जुन्या, गळक्या एसटी रस्त्यावर धावू लागल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे एसटी विभागाच्यावतीने जुन्या शहरी, ग्रामीणच्या एसटी गाड्या भंगारात टाकल्या आहेत. आतापर्यंत १५ हून अधिक गाड्या भंगारात गेल्या आहेत. काही ठिकाणी पर्यायी बसेसची सुविधा निर्माण करण्यात आली आहे, तर ज्या ठिकाणी अद्याप पर्यायी बसेस नाहीत त्या त्वरित उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:13 08-10-2025












