Rajapur: खड्ड्यांमुळे गाड्यांचे नुकसान!

राजापूर ः राजापूर शहरातील विविध भागांत जाणाऱ्‍या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे.

रस्त्यामध्ये ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमध्ये मार्गक्रमण करताना गाड्यांचे सातत्याने खिळखिळे होणारे विविध पार्ट आणि त्यावरील बेसुमार वाढता खर्च यामुळे प्रवासी वाहतूक धंदा कसा करायचा असा प्रश्‍न रिक्षा व्यावसायिकांना पडला आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह चिंचबांध कोंढेतडमार्गे हायवे व चिंचबांध वरचीपेठ मारुती मंदिर या मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवावेत, अशी मागणी नगर पालिकेकडे केली.

याबाबतचे निवेदन रिक्षाचालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी तुषार बाबर यांना दिले. या वेळी रिक्षा संघटनेचे समीर जैतापकर, अजिम जैतापकर, पराग चिंबुलकर, जुनेद गडकर, योगेश बाईत, अशोक बाईत, सर्जींत बलबले, फरीद मालीम, नियाज बलबले आदी रिक्षा चालक मालक प्रतिनिधी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे शहरातील विविध भागांतील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. जागोजागी भल्यामोठ्या पडलेल्या खडयांमुळे वाहन चालविणे जिकरीचे बनले आहे. त्यामुळे रिक्षाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असून रिक्षा व्यवसायच नको अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याबाबत रिक्षा चालक-मालकांच्या शिष्टमंडळाने माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी श्री. बाबर यांची भेट घेऊन कैफीयत मांडली. त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यासह विशेषतः कोंढेतड व वरचीपेठ मोठ्या पुलाकडे जाणाऱ्‍या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्याची मागणी केली. त्याचवेळी मच्छीमार्केट परिसरात असलेले सुलभ शौचालय बंद करण्यात आल्याने होणाऱ्‍या गैरसोयीबाबत मुख्याधिकारी श्री. बाबर यांचे लक्ष वेधले.

खड्डे बुजविण्याचे तत्काळ आदेश
रिक्षा चालक-मालक संघटनेच्या निवेदनाची मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी तत्काळ दखल घेतली असून वरचीपेठ व कोंढेतड भागातील खड्डे बुजविण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले. चिंचबांध मच्छीमार्केट परिसरातील बंदस्थितील शौचालयामुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी त्याठिकाणी नव्याने शौचालयाची उभारणी करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 09-10-2025