चिपळूण, ९ ऑक्टोबर २०२५: चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष, चिपळूण नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे निष्ठावंत नेते, संजयशेठ रेडीज यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने चिपळूणच्या सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला असून एक अभ्यासू, दूरदृष्टीचे आणि समर्पित व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना शहरात व्यक्त होत आहे.
संजयशेठ रेडीज हे सहकार क्षेत्रातील एक जाणकार आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळखले जात होते. अनेक वर्षे त्यांनी चिपळूण अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. आपल्या कार्यकाळात त्यांनी बँकेच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि बँकेला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेले. अध्यक्षपदानंतरही त्यांनी बँकेचे ‘पालक’ म्हणून जबाबदारी स्वीकारत संस्थेला आपले मार्गदर्शन सुरू ठेवले होते. त्यांच्या नेतृत्वाने बँकेला आर्थिक स्थिरता आणि विश्वासार्हता मिळवून दिली.
सहकाराप्रमाणेच त्यांचे राजकीय आणि सामाजिक कार्यही उल्लेखनीय होते. चिपळूण नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून त्यांनी शहराच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडले. सामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडून त्या सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रभागी राहिले. काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी पक्षाच्या विचारधारेला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
यासोबतच वैश्य समाज संघटनेच्या माध्यमातूनही त्यांचे सामाजिक कार्य अविरतपणे सुरू होते. समाजातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा, ज्यामुळे ते सर्वसामान्यांमध्ये एक लोकप्रिय आणि आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व बनले होते.
त्यांच्या आकस्मिक निधनाने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सहकार, राजकारण, आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून चिपळूणने एक विकासाची दृष्टी असलेला नेता आणि सहकारातील मार्गदर्शक गमावला आहे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:33 09-10-2025














