खेड : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण क्रांतिकारी अनंत कान्हेरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे केल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जाहीर केले आहे. सरकारने या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून या संस्थेला स्वतःची इमारत मिळावी यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नसताना नामकरण करण्यात आल्याने शिक्षणप्रेमीतून नाराजी व्यक्त होत आहे.
कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना शिंदे सरकारने नवी ओळख दिली आहे. जिल्ह्यातील ७ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. या संस्थांना आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल. युवकांचा कौशल्य विकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे आणि या नावांमुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपल्या कार्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल हे जरी खरे असले तरी आयटीआयला आधी त्यांच्या स्वमालकीची इमारत असणे गरजेचे आहे.
खेडमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भाड्याच्या जागेत विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत आहे. इमारत नसल्याने अनेक कौशल्य आधारित अभ्यासक्रम येथे बंद झाले आहेत. शेकडो विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात; परंतु त्यांना सुविधा मिळत नाहीत.
२४० गुंठे जागा संपादित; पण इमारत नाही
शहरात आयटीआयसाठी संपादित केलेल्या २४० गुंठे जागेवर इमारत उभारण्यास प्राधान्य देण्याऐवजी सरकारने नमकरणाला प्राधान्य दिल्याने शिक्षणप्रेमींची घोर निराशा झाली आहे. आगामी काळात तरी या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा या विद्यालयातून शिकणारे विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिक व्यक्त करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 23/Oct/2024














