Lote MIDC : लोटेतील प्रदूषणाची यंत्राद्वारे होणार तपासणी

चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीत होत असलेल्या वायू आणि जलप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर घाणेखुंट सरपंचांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोटे एमआयडीसीतील उद्योगांना नोटिसा बजावल्या आहेत. उद्योगांनी कंपनीत बसवलेली यंत्रणा योग्यप्रकारे कार्यरत आहे का, याची योग्य ती तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच लवकरच लोटे येथील वायूप्रदूषणाची यंत्रसामग्रीद्वारे तपासणी केली जाणार असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोटे औद्योगिक वसाहतीमधील परिसरात हवेतील प्रदषूण आणि जलप्रदूषणदेखील वाढलेले आहे. या प्रदूषणाचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने जनआंदोलन उभारण्याचा इशारा घाणेखुंटचे सरपंच संतोष ठसाळे यांनी दिला होता. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लोटेतील उद्योगांना नोटिसा बजावल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 11/Oct/2025