रत्नागिरी : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनांचा केलेला विसर, तसेच अवकाळी पाऊस आणि शेतमालाच्या नुकसानीकडे होत असलेले गंभीर दुर्लक्ष या विरोधात मोठे पाऊल उचलले आहे. विस्मरणात गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी त्यांनी नागपूर येथील विधानसभेला घेराव घालण्याचा निर्धार केला आहे. या भव्य आंदोलनाची सुरुवात १३ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी शहरात आयोजित शेतकरी मेळाव्याने होणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या ठाणे जिल्हाप्रमुख काजल नाईक यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली.
काजल नाईक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, आता आपली लढाई आपणच लढायची आहे, या भूमिकेतून बच्चू कडू यांनी नुकताच राज्यातील ३६ जिल्ह्यांचा झंझावाती दौरा पूर्ण केला असून, या दौऱ्याचा समारोप रत्नागिरीत होणार आहे. त्यांनी सरकारच्या प्राथमिकतांवर सडकून टीका केली. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठीच कडू यांचा १३ ऑक्टोबरचा रत्नागिरी दौरा निश्चित झाला आहे. त्यांच्या रत्नागिरी दौऱ्याची सुरुवात पहाटे गणपतीपुळे येथे आगमन आणि त्यानंतर नांदिवडे येथे सत्कार सोहळ्याने होणार असून, ते जिंदल कंपनीने उभारलेल्या टर्मिनलची पाहणीदेखील करणार आहेत.
या मेळाव्यात बच्चू कडू आंबा, मच्छीमार, पर्यटन आणि दिव्यांग यांच्या स्थानिक प्रश्नांवरही मार्गदर्शन करतील. विशेषतः जयगड जिंदल प्रकल्पाचा प्रश्न आणि बोगस एनओसी वापरून उभारलेल्या एनर्जी प्लांटमुळे गावकऱ्यांना होणारा त्रास, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे होत असल्याचा गंभीर आरोपही नाईक यांनी केला. मेळाव्यानंतर कडू जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिव्यांगांच्या स्थानिक प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. गोरगरिबांसाठी लढायचे आहे आणि सरकारला या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्यास भाग पाडायचे आहे, अशी त्यांची भूमिका असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले..
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 11/Oct/2025














