Rajapur : तळवडेत १३ ऑक्टोबर रोजी ‘जल हे विश्व’ कार्यक्रम

राजापूर : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अंतर्गत कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे आणि रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या वतीने अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील लाभ क्षेत्रातील शेतकरीवर्गासाठी पाण्याचे नियोजन व त्याचा लाभ याबाबत लोककला आणि लोकनृत्य यावर प्रबोधनात्मक कार्यक्रम ‘जल हे विश्व’ १३ ऑक्टोबरला सकाळी साडेदहा वाजता पाचल-तळवडे येथील प्रभावती हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.

तालुक्यातील सर्वात मोठा अर्जुना प्रकल्प मार्गी लागला असून त्यामध्ये अंशतः करक आणि पूर्णतः पांगरी या गावांचे विस्थापन झाले आहे. समस्त प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून त्यांच्या मालमत्तेची नुकसानभरपाई यापूर्वीच देण्यात आली असून चार ठिकाणी पुनर्वसन वसाहत स्थापन करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी समस्त प्रकल्पग्रस्तांचे विस्थापन करण्यात आले आहे. अर्जुना प्रकल्पाच्या दोन्ही बाजूंनी बंदिस्त पाईपलाईन मधून परिसरातील शेतकरी वर्गाला त्यांच्या भात शेतीसाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणावर काम मार्गी लागले असून अर्जुना प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाण्याचे नियोजन कसे करावे, याबाबत प्रबोधन केले जाणार आहे.

यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सरपंचांना निमंत्रित केल्याचे रत्नागिरी पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी कळवले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 11/Oct/2025