Post Office : टपालखात्याचे रजिस्टर सेवा, स्पीड पोस्टसेवेचे एकत्रीकरण

रत्नागिरी : भारतीय डाकसेवा ही जनसेवा हे ब्रीद घेऊन १७१ वर्षे कार्यरत आहे. बदलत्या युगात आता टपालखात्याने रजिस्टर सेवा व स्पीड पोस्टसेवेचे एकत्रीकरण केले आहे. त्यामुळे ही सेवा न्यायिक पत्रे, वकील, व्यावसायिक यांच्यासाठी सोयीची ठरणार आहे; तसेच परदेशांत आपल्या कुटुंबीयांनी दिवाळी फराळ पाठवण्यासही रत्नागिरीतून सुरुवात झाली आहे, अशी माहिती डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डाकघर अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला सहायक डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी, गजानन करमरकर उपस्थित होते. सरंगले यांनी सांगितले की, आजच्या युगात ५० पैसेएवढ्या अल्पदरात डाकसेवा दिली जात आहे. डाकविभाग त्यामागे जवळपास २० रुपयांचा तोटा सहन करत आहे; परंतु डाक ही जनसेवा असल्याने ही सेवा दिली जात राहील. १ ऑक्टोबरपासून रजिस्टर सेवा व स्पीड पोस्टसेवेचे एकत्रीकरण झाले आहे. गेल्याच महिन्यात जिल्ह्यातील सर्व सरपंचांना पत्र पाठवून टपालखात्याच्या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल.

अनेक संस्था, वकील यांना स्पीडपोस्टची आवश्यकता भासते. अॅड्रेसी स्पेसिफिक या सेवेसाठी न्यायिक पत्रे, वकिलांची पत्रे पाठवण्यासाठी नवीन दर लागू झाला आहे. यानुसार ५० ग्रॅम वजनाच्या एका पाकिटासाठी स्थानिक १९ रुपये ते कमाल ४७ रुपये, ५१ ते २५० ग्रॅमसाठी स्थानिक २४ व कमाल ७७रुपये आणि २५१ ते ५०० ग्रॅमसाठी स्थानिक २८ व कमाल ९३ रुपये भरावे लागतील. अॅड्रेसी स्पेसिफिक रजिस्ट्रेशनसाठी ५ रुपये भरून फक्त त्याच व्यक्तीला वितरण करता येईल. पोचपावती पत्र पाठवण्यास प्राप्त होण्याची सुविधा दहा रुपये व जीएसटी भरून घेता येईल तसेच मोबाईल ओटीपी आधारावर वितरण करण्यासाठी ५ रुपये अधिक प्रभार भरावा लागेल.

काळानुसार, टपाल विभागात अनेक सुधारणा होत आहेत. पूर्वी एसटीनेच टपाल विभागाची सर्व पार्सल येत होती; परंतु आता रत्नागिरीतून पहाटे टपाल विभागाचे वाहन रत्नागिरी ते मंडणगड तालुक्यापर्यंत जाऊन रात्रीपर्यंत परत येते. यामुळे टपाल वेळेतच पोहोचवण्यासाठी सुलभ होत आहे. गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या अत्याधुनिक सिस्टिममुळेही तत्पर सेवा देण्यासाठी टपाल विभाग कटिबद्ध आहे. –ए. डी. सरंगले, डाकघर अधीक्षक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:51 PM 11/Oct/2025