रत्नागिरी : दिवाळी म्हटलं की, बच्चेकंपनी दगडमातीच्या दुर्ग, किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून छत्रपती शिवरायांना अभिवादन करतात. या माध्यमातूनच याच दुर्गांच्या प्रतिकृती साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात “अमृत “ने दुर्गोत्सवाचे आयोजन या दीपावलीमध्ये केले आहे. याचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
शिवछत्रपतींच्या पराक्रमांचे साक्षीदार असलेल्या १२ दुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या वास्तूंमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि साऱ्या महाराष्ट्राचा ऊर अभिमानाने भरून आला. या पार्श्वभूमीवर दुर्गोत्सवाचे आयोजन केले आहे.
बालदोस्त आणि नागरिकांनीही अंगणात, बाल्कनीमध्ये, हाउसिंग सोसायटीच्या आवारात जागतिक वारसास्थळांतील १२ दुर्गापैकी कोणतीही एक हुबेहूब प्रतिकृती बनवावी आणि आपल्या संकेतस्थळावर http://www. durgotsav.com त्या सोबतचे सेल्फी पाठवावेत.
दुर्गोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण पुण्याच्या शिवसृष्टी हिस्टोरिकल थीम पार्कमध्ये अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अमृतचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीराम बेंडे, प्रवीण पांडे आणि सिद्धेश्वर वरणगावकर आणि राज्य व्यवस्थापक दीपक जोशी उपस्थित होते.
दुर्गोत्सवात सहभागी झालेल्या सर्वांना मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीने अभिनंदनपत्र पाठवण्यात येणार आहे तसेच अमृतविद्या या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवरील शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास व त्यातून आज घ्यावयाचे धडे, या विषयावरील प्रशिक्षण निःशुल्क उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या बारा दुर्गापैकी एक साकारा प्रतिकृती
रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग, खांदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग (सुवर्णदुर्ग) या १२ गडदुर्गापैकी कोणताही एक गडदुर्ग बनवावा. गडदुर्गाचा आकार कमीत कमी दोन फूट असावा. जास्तीत जास्त कितीही चालू शकेल.
रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बालदोस्त, महिला, नागरिकांनी गडदुर्ग बनवून त्यासह सेल्फी काढून, दुर्गोत्सवाचे संकेतस्थळावर अपलोड करावेत- विजय जोशी, व्यवस्थापकीय संचालक, अमृत
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 11/Oct/2025














