गुहागर : एकाच विहिरीत दोन जलाशयांची निर्मिती करुन पावसाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी साठवणुकीची क्षमता सिध्द करणारा एक भन्नाट प्रयोग गुहागर तालुक्यातील वेळणेश्वरचे निवृत्त प्राध्यापक व संशोधक डॉ. चंद्रशेखर गाडगीळ यांच्या कल्पनेतून साकारला आहे. यासाठी केंद्र सरकारकडून त्यांना पेटंट प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. गुहागर तालुक्यातील हा एक भन्नाट अभिनव प्रयोग देशपातळीवर कौतुकास्पद ठरला आहे.
राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो; मात्र सच्छिद्र जांभा पाणी धरुन ठेवत नाही. डोंगराळ प्रदेशामुळे पाणी वेगाने ओढ्या, नद्यांमार्गे खाडी व समुद्रात वाहून जाते. तसेच पावसाळ्यानंतर भूजल पातळीही झपाट्याने खाली जाते. परिणामी मुबलक पाणी असूनही दरवर्षी कोकणाला पाणीटंचाईची झळ बसते. यावर उपाय म्हणून एक संकल्पना मनात आणून डॉ. गाडगीळ यांनी यावर एक प्रयोग केला.
दरम्यान, या प्रयोगाबाबत डॉ. गाडगीळ यांनी या सांगितले की, एका सामान्य विहिरीला भूजल आणि पावसाचे पाणी दोन्ही साठविण्यासाठी दोन पातळ्यांवर रुपांतरीत करता येते ती म्हणजे बहुस्तरीय साठवण विहिरीची रचना, तर विहिरीच्या तळाशी असलेला नैसर्गिक स्त्रोत म्हणजे झऱ्यापासून आलेल्या पाण्याचा साठा म्हणजे पहिला जलाशय होय.
या पाण्याच्या वरच्या विहिरीच्या रिकाम्या भागात एक भक्कम काँक्रीटचा स्लॅब टाकून विहिरीत एक मजलाच तयार होतो, यालाच विहिरीची विभागणी म्हणतात. याच स्लॅबच्यावर बांधलेली साठवण टाकी म्हणजेच दुसरा जलाशय. यामध्ये पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणाऱ्या विहिरीचे तसेच टाकीत पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवता येते. एवढेच नाही तर अधिक पाणी साठविण्यासाठी लगतच्या मोकळ्या जमिनीवर म्हणजेच दुसऱ्या स्तरावर विहिरीतील टाकीभोवती वर्तुळाकार टाकीही बांधली. या सगळ्याची देखभाल करण्यासाठी एक प्रवेशनलिका तयार केली. ही एक अशी सोय आहे की, ज्यामुळे वरच्या पाण्याला हात न लावता थेट खालच्या विहिरीतील जलाशयापर्यंत जाता येते. त्यामुळे विहिरीतील पाणी पंपाने सहज काढता येते.
विहिरीत घातलेला विभागणीचा मधला स्लॅब मात्र मजबूतच हवा. कारण पावसाळ्यात तुडुंब भरणाऱ्या विहिरीतील पाण्याचा प्रचंड दाब तसेच विहिरीतील पाण्याची पातळी खाली गेल्यावर वरच्या टाकीतील लाखो लिटर पाण्याचा दाब. हे दोन्ही दाब सहन करण्याची ताकद या स्लॅबमध्ये असणे गरजेचे आहे. विहिरीलगतच्या मोकळ्या जागेवर आतल्या टाकीला समांतर भिंत बांधून दुसरी टाकी निर्माण करता येते व या दुसऱ्या स्तरावरही पाण्याची साठवण होते. अलिकडेच पूर्ण झालेल्या या प्रयोगाने वेळणेश्वरमध्ये एका विहिरीमध्ये व भोवती मिळून सुमारे ३ लाख लिटर पाण्याची साठवण करण्यात आल्याचे डॉ. गाडगीळ यांनी सांगितले.
पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा सिंचनास उपयोग
या विहिरीमुळे पावसाचे साठविलेले अतिरिक्त पाणी सिंचनासाठी उपयोगाला येते. जिथे बागायतदार, शेतकरी एक पीक घ्यायचे, तिथे या पाण्यावर दोन पिके घेतली जातील, असेही त्यांनी सांगितले. या बहुस्तरीय विहिरीमुळे अस्तित्वात असलेल्या विहिरीचा वापर, पर्यावरणावर कमी परिणाम, भूजल व पर्जन्यजल संयुक्त संचयनाचा वापर उपयुक्त असल्याचे डॉ. गाडगीळ यांनी सांगितले. डॉ. गाडगीळांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र भुवड व सहकाऱ्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 11/Oct/2025














