चिपळूण : गेल्या एका वर्षांपासून सुरज शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून फक्त कागदावरच राहिलेल्या अनेक ई-सेवा आता ग्रामपंचायत स्तरावर मिळणार आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीना होणार आहे.
ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांना प्रत्यक्ष भेटून ई-सेवा संधर्भात सुरज शिंदे यांनी निवेदन दिले होते. त्यानुसार त्यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आधारकार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट नोंदणी, रेल्वे बस आरक्षण, मोबाईल/डी.टी.एच. रिचार्ज, वीज बिल भरणे, ग्रामपंचायत स्तरावर बैंकिंग सेवा उपलब्ध करणे, विमा हप्ते भरणे/विमा वितरित करणे, पी.एम. किसान योजना अर्ज, पी.एम. फसल विमा योजना अर्ज, महा डी.बी.टी. द्वारे शेती उपयुक्त अवजारांसाठी अर्ज, डिजटल ७/१२ व ८ अ शिरगांव, ता. चिपळूण येथील ग्रामपंचायत शिरगांव येथे शासन निर्णय नुसार “आपले सरकार ई-सेवा केंद्र” मार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची भेट सुरज शिंदे यांनी मंत्रालयात घेतली. त्याची तत्काळ दखल घेऊन मंत्रीमहोदय यांनी सर्व ई सेवा ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्याचे आदेश उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांना दिले. त्यानुसार त्यांनी ठोस पावले उचलली आहेत. ग्रामपंचायत स्तरावर “आपले सरकार ई -सेवा केंद्र” कार्यान्वित करण्याकरिता ग्रामपंचायतीच्या नावे आयडी प्राप्त करणे, वॉलेट तयार करणे आवश्यक आहे. सदर अनुषंगाने सेवा केंद्र कार्यान्वित करण्याकरिता आयटी कार्यालयामार्फत प्राप्त झालेले ग्रामपंचायतीचे आयडी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना पाठवण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या नावे ई-सेवा युजर आयडी तयार करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे “आपले सरकार ई – सेवा केंद्र” वॉलेट सर्व ग्रामपंचातींच्या नावे वेगळे काढण्यात यावे असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना कळविले आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या नावे स्वतंत्र सिम कार्ड घेण्यात यावे व प्रोफाईल देखील त्याच सिम कार्डशी जोडण्यात यावे, जेणेकरून प्राप्त OTP त्याच सिम कार्ड वर येतील. त्याचप्रमाणे “आपले सरकार ई सेवा केंद्र” याचे ऑनलाईन कामकाज कशा पद्धतीने करावे याकरिता महा आयटी कार्यालयामार्फत तालुकास्तरीय प्रशिक्षण कर्मचाऱ्यांकरिता आयोजित करण्यात येणार आहे असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 11/Oct/2025














