गुहागर : तालुक्यातील नरवण धरणवाडी भागात २०१८ साली उभारण्यात आलेला BSNL मोबाईल टॉवर नेटवर्क अभावी अनेक दिवस बंद राहत आल्याने परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या टॉवरच्या माध्यमातून नरवण, तवसाळ, कर्दे, मुसलोंडी, चिंद्रावळे, दोडवली, मासु, जांभारी, काताळे, साखरी आगर, हेदवी आणि वाघांबे अशा दहा ते बारा गावांना नेटवर्क मिळावे, अशी संकल्पना होती. मात्र, आजही मोबाईल रेंज नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
नरवण हे या सर्व गावांसाठी मुख्य बाजारपेठ असून येथून डॉक्टर, मेडिकल, किराणा, भातचक्की, लाकूड व्यवसाय, तसेच मुंबई-पुणे प्रवासासाठी वाहतूक सुविधा अशा अनेक सेवा पुरवल्या जातात. दरवर्षी येथे देवदिपावली निमित्त मोठी ‘बगाडा जत्रा’ भरते, यासाठी मुंबई-पुणे येथून हजारो भाविक येतात. मात्र, गावात नेटवर्क नसल्यामुळे अनेकांना संपर्क साधणे आणि व्यवहार करणे कठीण होत आहे.
स्थानिक ग्रामस्थ विशाल मोरे यांनी सांगितले की, “महावितरणची वीज गेली की टॉवर बंद पडतो, कारण त्यासाठी कोणतीही बॅटरी बॅकअप किंवा सौरऊर्जा प्रणाली नाही. महिन्यात केवळ ८ ते १० दिवसच हा टॉवर चालू असतो.
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात फायबर ऑप्टिकद्वारे सुपरफास्ट इंटरनेट जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. Jio आणि Airtel यांनी इंटरनेट केबल टाकली असली, तरी ती जोडलेली नाही. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्चुन उभारलेले टॉवर निष्क्रिय पडले आहेत. येथील ग्रामस्थ आणि दुकानदार सांगतात की, नेटवर्क नसल्यामुळे डिजिटल व्यवहार, ऑनलाईन पेमेंट, आणि शासकीय योजनांच्या अर्ज प्रक्रियेत मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. अनेक वेळा सबस्टेशन आणि विभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही फक्त “नरवण ते जयगड टॉवर वायरलेस जोडत आहोत” अशी उडवाउडवीची उत्तरे मिळतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 11/Oct/2025














