Rajapur : रायपाटण खिंडीत दुचाकीसमोर म्हशी आडव्या आल्याने अपघात; दोघे जखमी

राजापूर : राजापूर तालुक्यातील ओणी अणुस्कुरा मार्गावरील रायपाटणच्या खिंडीत दोन दिवसांपूर्वी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास रस्त्यावर काही म्हशी आडव्या आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरून जात असलेले रायपाटणचे रहिवासी रामदास गांगण व सुहास गांगण हे जखमी झाले. या अपघातात दोघांच्याही हाताची हाडे फॅक्चर झाली असून, त्यांच्यावर सिंधुदुर्ग येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पडवे रायपाटण येथील रामदास गांगण आणि सुहास गांगण हे दोघे दुचाकीवरून ओणी अनुस्कुरा मागनि जात होते. रायपाटणच्या खिंडीत रस्त्यावर अचानक असंख्य म्हशी आडव्या आल्याने त्यांना काही कळायच्या आतच दुचाकीवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि त्यांचा अपघात झाला. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या हाताची हाडे फॅक्चर झाली आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. समीर खानविलकर, महेश गांगण, सुशांत गांगण, विशाल गांगण आणि तुषार गांगण या युवकांनी कोणतीही वेळ न घालवता जखमींना तत्काळ उपचारासाठी सिंधुदुर्ग येथील पडवे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यामुळे दोघांवर त्वरित उपचार सुरू होऊ शकले.

वास्तविक पाहता या मार्गावर आणि अन्य ठिकाणीही मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे लहान-मोठे अपघात सातत्याने होत असतात जीवित आणि वित्तहानी होत आहे. मोकाट गुरांना आवर घालण्याबाबत वारंवार जनजागृती होऊन, अपघाताच्या घटना समोर येऊनही प्रशासन यावर कोणतीही ठोस भूमिका का घेत नाही, असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. रायपाटणच्या खिंडीतील या ताज्या अपघातामुळे दोन निरपराध व्यक्तींना मोठी दुखापत झाली आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन मोकाट गुरांच्या मालकांवर कठोर कारवाई करावी आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व अपघातग्रस्तांचे कुटुंबीय करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 13/Oct/2025