चिपळूण : चिपळूण नगर परिषद, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या सहकायनि सप्टेंबर २०२५ मध्ये आयोजित केलेल्या प्लास्टिकमुक्त होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे.
सप्टेंबर महिन्यात या उपक्रमात एकूण १५२ महिलांनी सहभाग घेतला. सहभागी महिलांनी जमा केलेल्या प्लास्टिकच्या प्रमाणानुसार ५०० ग्रॅम प्लास्टिक जमा करणाऱ्या प्रत्येक महिलेला एक कूपन दिले गेले. एकूण ५५८ किलो प्लास्टिक शहरातील विविध भागांतून जमा करण्यात आले. विशेष म्हणजे ७ किंवा त्याहून अधिक कूपन जमा करणाऱ्या ५६ महिलांना विशेष गौरव देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट घराघरांत प्लास्टिक वापर कमी करणे, पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि महिलांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे हा आहे. सहभागी सर्व महिलांना खेळ पैठणीचामध्ये सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार असून, विशेष पुरस्कारास पात्र विजेत्यांसाठी पैठणीचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेतील प्रमुख पुरस्कारांमध्ये सर्वात जास्त प्लास्टिक जमा करणाऱ्या महिलेला पैठणी, नवीन जास्तीत जास्त महिलांना सहभागी करणाऱ्या महिलेला पैठणी, ७ पेक्षा जास्त कूपन धारकांमध्ये लकी ड्रॉ विजेत्याला पैठणी मिळणार आहे. पारितोषिक वितरणाला आमदार शेखर निकम, नगर परिषद मुख्याधिकारी विशाल भोसले, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे, न.प. चे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
प्लास्टिक मुक्तीला चालना : मुख्याधिकारी
मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शहरातील सर्व नागरिक सहभागी महिलांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी विशेषतः म्हटले की, सर्व सहभागी महिलांच्या प्रयत्नांमुळे शहरात प्लास्टिकमुक्त वातावरण निर्मितीला चालना मिळणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 13/Oct/2025














