◼️ अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचा (AMGM) अनोखा उपक्रम; रत्नागिरीसह राज्यभर आयोजन
रत्नागिरी : महाराष्ट्राच्या घराघरात दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची प्रतिकृती (किल्ले) उभारण्याची शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे. यंदा महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांना ‘MARATHA MILITARY LANDSCAPES OF INDIA’ या नावाने युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचे नामांकन नुकतेच जाहीर केले आहे, ज्यामुळे छत्रपतींचा गौरवशाली इतिहास सातासमुद्रापार पोहोचला आहे. याच अभिमानास्पद घटनेचे औचित्य साधून महाराष्ट्रातील गिर्यारोहण संस्थांची शिखर संघटना असलेल्या “अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ” (AMGM) तर्फे यंदा राज्य पातळीवर विशेष ‘किल्ले बांधणी स्पर्धा-२०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे.
१२ नामांकित किल्ल्यांच्या प्रतिकृतींना प्राधान्य:
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, सहभागी स्पर्धकांनी ज्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचे नामांकन प्राप्त झाले आहे, त्याच किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करायच्या आहेत. यामुळे या किल्ल्यांची भौगोलिक रचना, ऐतिहासिक व सामरिक महत्त्व सर्वांना समजावे आणि याबद्दल समाजात जनजागृती व्हावी, हा महासंघाचा उद्देश आहे. ही स्पर्धा आगामी काळात अधिक व्यापक स्वरूपात आयोजित केली जाईल, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष श्री. उमेश झिरपे यांनी दिली.
स्पर्धेचे स्वरूप आणि आयोजन:
महासंघाच्या विविध जिल्हा संघटनांमार्फत महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये दिनांक १७ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
- ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये घेतली जाईल.
- विजेत्यांना महासंघाकडून अत्यंत आकर्षक व उपयुक्त पारितोषिके, ढाल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येईल.
- स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दोन ठिकाणी स्पर्धा:
यावर्षी प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी आणि देवरुख या दोन ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - संपर्कासाठी:
- स्पर्धेचे प्रमुख समन्वयक (राज्यस्तर): राहुल मेश्राम (९८३३३९४०४७) व डॉ. राहुल वारंगे (९४२२६९२१८७)
- रत्नागिरी जिल्हा संपर्क: श्री राजेश नेने (922 63 86 426) व श्री. वीरेंद्र वणजू (99 60 977 333)
टीप: स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर फॉर्म भरून द्यावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 13-10-2025














