रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीमधील देहव्यापार प्रकरणातील संशयित आरोपीची सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. सुनीलकुमार गणपत प्रभू (वय ६०, रा. मिरजोळे एमआयडीसी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३ (३), ३(५) आणि अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा, १९५६ चे कलम ३, ४ व ५ अंतर्गत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली होती.
एमआयडीसी येथे एक नेपाळी महिला दोन तरुणींच्या माध्यमातून देहव्यापार चालवित असल्याचा धक्कादायक प्रकार १८ सप्टेंबर २०२५ रोजी समोर आला होता. ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी गीता थापा या नेपाळी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या तपासामध्ये ज्या एमआयडीसीमधील ६९ नंबरच्या प्लॉटमध्ये हा प्रकार चालवला जात होता, तो सुनीलकुमार प्रभू याच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली. तसेच गीता थापाने काही पैसे प्रभू याला ऑनलाईन पाठवले असल्याचेही पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. त्यानुसार पोलिसांनी प्रभू याच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करत अटक केली.
प्रभू याने आपल्या जामीन अर्जात न्यायालयापुढे सांगितले की, आपण कोणताही गुन्हा केला नाही, आपल्याला चुकीच्या पद्धतीने फसवून गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. आपला कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. आपण सुशिक्षित ६० वर्षांचे आहोत, माझी आई ९५ वर्षांची असून अविवाहित बहिणीसोबत राहतात. गीता थापा ही मोलकरीण म्हणून ठेवली होती आणि तिला राहण्यासाठी एक खोली दिली होती, जी तिने चुकीच्या हेतूने वापरली. आपला वेश्या व्यवसायाशी काहीही संबंध नाही. म्हणून जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती केली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 13/Oct/2025














