Prashant Yadav | ‘साफ यिस्ट’ प्रकरणी लवकरच मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांना भेटणार : प्रशांत यादव

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली येथील साफ यिस्ट कंपनीत कार्यरत असलेल्या कामगारांवर कंपनी व्यवस्थापनाकडून केलेल्या अन्यायकारक कारवाईबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची माहिती भाजप नेते प्रशांत यादव यांनी दिली. कंपनीकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात कामगारांनी १४ ऑक्टोबर रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. या उपोषणासही आमचा पाठिंबा राहील, असे यादव यांनी सांगितले आहे.

याबाबत प्रशांत यादव म्हणाले, की सुमारे २५ वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या कामगारांना कामावरून कमी केले आहे. २६ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनी व्यवस्थापनाने तडकाफडकी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सदरच्या कामगारांना कामावर हजर होण्यास मज्जाव केला. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने टप्प्याटप्प्याने संबंधित कामगारांना कामावर हजर करून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काही कामगारांना पहिल्या प्रशांत यादव टप्प्यात हजर करून घेण्यात आले; मात्र त्यांनाही कंपनीत अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे दिसून आले.

कामगार संघटनेने यासंदर्भात कंपनीकडे तसेच स्थानिक प्रशासनाकडे वारंवार निवेदन दिले असूनही कोणतीही सकारात्मक कारवाई झालेली नाही. परिणामी सुमारे २४० कामगारांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कामगारांनी १४ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. या उपोषणासही आमचा पाठिंबा राहील.

दीपावलीचा सण तोंडावर असताना या कंपनीत अनेक वर्षे काम केलेल्या सुमारे २४० कामगारांवर कंपनीने अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. सदरचे कामगार खडपोली, गाणे, वालोटी, कळकवणे आणि लगतच्या परिसरातील स्थानिक नागरिक आहेत.

आपल्याच परिसरातील स्थानिकांवर ऐन सणासुदीच्या तोंडावर साफयिस्ट कंपनीकडून अन्याय होत असेल, तर तो सहन केला जाणार नाही. यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार आहोत. सदरच्या कामगारांवरील अन्यायकारक कारवाई रद्द व्हावी आणि या सर्व कामगारांना सन्मानपूर्वक कंपनीत रुजू करून घेण्यात यावे, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे प्रशांत यादव यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 13/Oct/2025