Ratnagiri : लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी संशयिताला जामीन मंजूर

रत्नागिरी : लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेशी शरीरसंबंध ठेवून फसवणूक करणाऱ्या संशयिताची रत्नागिरी सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. शादाब शौकत गोलंदाज (वय ३५, रा. मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. शादाब याने याप्रकरणी रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. गुन्ह्यातील माहितीनुसार, पीडिता २८ वर्षीय घटस्फोटीत महिला आहे.

एप्रिल २०२४ मध्ये तिने एक एअर कंडिशनर खरेदी केला. यावेळी आरोपी तिच्या घरी ए. सी. बसवण्यासाठी आला. त्यानंतर दोघांमध्ये नियमित संपर्क सुरू झाला आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघं विविध ठिकाणी एकत्र राहू लागले. त्या काळात आरोपीने वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. नंतर आरोपीचा स्वभाव बदलला आणि तो तिला किरकोळ कारणांवरून शिवीगाळ व मारहाण करू लागला. २०२४ मध्ये गणपती उत्सवाच्या दरम्यान आरोपीने पीडितेला मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी तिच्या माहेरी गेली आणि तिने घडलेल्या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली.

काही दिवसांनी आरोपीने तिला भेटून पुन्हा लग्नाचे आश्वासन दिले व तिला परत घेऊन गेला. मात्र, पुन्हा त्याने विवाह टाळला. जेव्हा तिने त्याला सांगितले की, तो जर लग्न करत नसेल, तर ती माहेरी जाईल, त्यावेळी आरोपीने धमकी दिली की, ‘जर तू तुझ्या आई-वडिलांच्या घरी गेलीस, तर मी रक्ताचे सडे पाडीन’ त्यानंतरही आरोपी तिला मारहाण करू लागला. ११ सप्टेंबर २०२५ रोजी ती माहेरी परत गेली आणि आई-वडिलांना आरोपीकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आरोपी पुन्हा पीडितेच्या घरी आला. त्यामुळे तिला आपल्याला इजा होण्याची किंवा जीवितास धोका होण्याची भीती वाटली, म्हणून तिने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६९,११५(२),३५२, ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल केला. तसेच संशयित आरोपी शादाब याला अटक केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 13/Oct/2025