Chiplun : चिपळूण शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

चिपळूण : शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी राज्य सरकारने समिती गठित केली आहे. नवीन पूररेषा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने चिपळूण शहरातील बांधकाम व्यावसायिकांसह शहरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शासनाच्या एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार, निळी रेषा (२५ वर्षांतील मोठा पूर) आणि लाल रेषा (१०० वर्षांतील मोठा पूर) या दोन पूररेषा निश्चित करून त्यामध्ये बांधकामासाठी परवानगीचे नियम तयार केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागावर आहे; मात्र नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांचा या पूररेषेला विरोध आहे. जुलै २०२१ मध्ये चिपळूण शहरात महापूर आला त्याचवेळी चिपळूण शहरासाठी नवीन पूररेषा लागू करण्यात आली. त्याला बांधकाम व्यावसायिकांनी विरोध दर्शवला. तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील चिपळूणला आले असता नवी पूररेषा रद्द करण्याची मागणी येथील लोकप्रतिनिधींनी केली होती. तेव्हा नवीन पूररेषा रद्द होणार नाही; मात्र त्यात बदल होतील, असे आश्वासन तत्कालीन मंत्री पाटील यांनी दिले होते; परंतु महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर हा विषय प्रलंबित राहिला.

बांधकाम व्यावसायिक आणि चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा केला. शहरामध्ये बांधकामासाठी लादलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी चिपळूण बचाव समितीने केली होती. हा विषय राज्यातील १८ मोठ्या शहरांशी निगडित असल्यामुळे त्यावर निर्णय घेण्यासाठी शासनाने एक समिती गठित केली आहे. या समितीमध्ये जलसंपदा विभाग वरिष्ठ अधिकारी, पालिकांचे मुख्याधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त आणि इतर तज्ज्ञ समितीचे सदस्य असणार आहेत. नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

निळ्या रेषेमधील क्षेत्रामध्ये नियमाप्रमाणे बांधकामांना परवानगी देण्यास व गुजरात राज्यातील जीडीसीपीआरमधील कलम २७ प्रमाणे महाराष्ट्रातील युडीसीपीआरमध्ये बदल करून बांधकाम परवानगी देण्याचे आदेश पारीत करावेत. यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली आहे. ही समिती सरकारला शिफारस करेल त्याप्रमाणे ब्ल्यू लाइनमधील बांधकामासाठीच्या जुन्या अटी रद्द करून नव्या अटींचा समावेश केला जाईल. चिपळूणमधील लोकप्रतिनिधी, क्रीडाई आणि चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू होते. त्याला यश येताना दिसून येत आहे. राज्य सरकार जो निर्णय घेईल, तो सामान्य लोकांच्या हिताचा असेल- राजेश वाजे, अध्यक्ष, चिपळूण बचाव समिती

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 13/Oct/2025