खेड : तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. तालुक्यातील आपेडे येथे गेले चार दिवस वीज गायब आहे. यामुळे नळपाणी पुरवठा योजनेवरही परिणाम झाला आहे. वेरळ परिसरात रविवारी सायंकाळपासून सलग १० तास खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागला.
महावितरणच्या कारभाराचे तीनतेरा वाजले आहेत. कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. यामुळे वीज उपकरणांवरदेखील परिणाम होत असून, आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
आपेडे येथे गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा गायब झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रत्नागिरी येथील यंत्रणा पाचारण करण्यात आल्याचे समजते. वेरळ व भरणे परिसरात खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. विजेअभावी भरणे जॅकवेल येथील टाक्या भरण्यास विलंब लागला. याचमुळे महाडनाका परिसरासह अन्य भागांत पाणीपुरवठा वितरित होऊ शकला नाही. वेरळ परिसरातही रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. सलग १० तास खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला. मध्यरात्रीच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत होताच ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 23-10-2024














