लांजा : मुचकुंदी लघु पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत करण्यात येणाऱ्या कालव्यामधील बाधित शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करून त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई व योग्य तो मोबदला द्यावा. अन्यथा बाधित शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुचकुंदी लघुपाटबंधारे प्रकल्प पुनर्वसन समितीचे माजी अध्यक्ष विजय इंदुलकर यांनी कृषी विभागाला दिला आहे.
मुचकुंदी लघुपाटबंधारे प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील खोरनिनको येथे धरण पूर्णत्वास गेले आहे. या प्रकल्पांतर्गत कालवा खोदण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र या कालव्यामध्ये बाधित होणाऱ्या झाडांचे योग्य मूल्यांकन कृषी विभागाच्या माध्यमातून केले नाही. म्हणून या झाडांचा मोबदला अत्यंत तुटपुंजा स्वरूपात शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात संबंधित शेतकरी यांच्यावर अन्याय होत आहे.
खरंतर ज्या पद्धतीने लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत धरणाचे ज्या प्रमाणात बाधित शेतकऱ्यांना झाडांचे मूल्यांकन करून नुकसान भरपाई दिली त्याच पद्धतीने कालव्यामध्ये देखील बाधित झालेल्या शेतकऱ्यांना व त्यांच्या जमिनीचा तसेच बाधित झाडांचा योग्य तो मोबदला देणे अपेक्षित आहे. मात्र कृषी विभाग झाडाच्या मूल्यांकनापेक्षा किमान दहा टक्के इतका देखील किंमत शेतकऱ्यांना देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबत शासन व कृषी विभागाने त्वरित दखल घेऊन बाधित शेतकऱ्यांना मोबदला शासन नियमाप्रमाणे देण्यात यावा, अन्यथा बाधित शेतकऱ्यांसह आंदोलनाचा इशारा इंदुलकर यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांची जमीन, झाडांना तुटपुंजी मदत
सुमारे १५ वर्षांपूर्वी मुचकुंदी लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येथे धरण बांधण्यात आले. त्या धरणाच्या माध्यमातून १४०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन होईल व पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी होईल या भावनेतून शेतकऱ्यांनी घरे, झाडे, जमीन शासनाकडे सुपूर्द केली व स्वतःचे पुनर्वसन करून घेतले. असे असताना कृषी विभागाच्या वतीने जे कालव्याचे काम करण्यात येत आहे, त्यामध्ये बाधित होणाऱ्या झाडांना वेगळ्या प्रकारे न्याय देऊन तुटपुंजी किंमत देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 13/Oct/2025














