मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले. स्नेहभोजनासाठी ही भेट झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी राज आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्यामध्ये तब्बल पावणे तीन तास चर्चा झाल्याची माहिती आहे.
त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये युतीवर अंतिम चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सातत्याने भेटीगाठी होत आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून हे दोन बंधू एकत्र आले. त्यानंतर आजची ही त्यांची सहावी भेट आहे.
पावणे तीन तास चर्चा
राज ठाकरे हे सहकुटुंब उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीवर पोहोचले. त्यावेळी त्यांची आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्ये पावणे तीन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. आता ही चर्चा नेमक्या कोणत्या मुद्द्यावर झाली, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर या भेटीमध्ये काही चर्चा झाली का याची मात्र स्पष्टता नाही.
राज ठाकरेंच्या मनसेकडून दिवाळीत शिवाजी पार्कमध्ये दीपोस्तवाचे आयोजन करण्यात येते. त्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं का, उद्धव ठाकरे हे मनसेच्या दीपोस्तवाला हजर राहणार का हे पाहावं लागेल.
तब्बल दोन तास 40 मिनिटांनी राज ठाकरे मातोश्रीवरुन बाहेर पडले. त्यानंतर राज ठाकरे हे त्यांच्या गाडीतून बाहेर पडले. त्यांच्या मागे मित ठाकरे, मिताली ठाकरे आणि उर्वशी ठाकरे यांची गाडी बाहेर पडले.
Raj Thackeray Uddhav Thackeray MeetHistory : या आधी राज-उद्धव कधी एकत्र?
5 जुलै- मराठी विजयी मेळावा ( राज आणि उद्धव ठाकरे हे 20 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आले होते)
24 जुलै – उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसादिवशी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी गेले होते.
27 ऑगस्ट – गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थवर गेले होते.
10 सप्टेंबर – उद्धव ठाकरे हे संजय राऊत, अनिल परबांसह राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर गेले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये अडीच तास चर्चा झाली होती.
5 ऑक्टोबर – राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते.
12 ऑक्टोबर – स्नेहभोजनासाठी राज ठाकरे कुटुंबासह मातोश्रीवर पोहोचले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 13-10-2025














