रत्नागिरी : सध्या जिल्ह्यात सर्वत्रच मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रत्नागिरी शहरासह नजीकच्या ग्रामपंचायत भागातही मोकाट गुरांची संख्या वाढतच आहे. या मोकाट गुरांमध्ये गाई आणि वासरांना शहरालगत सोमेश्वर येथे विश्वमंगल गोशाळेचा आधार मिळणार आहे. सध्या या गोशाळेत ५४ गाई व वासरे आहेत. त्यांची जपणूक सोमेश्वर शांतीपीठतर्फे करण्यात येत आहे.
या गोशाळेबद्दल व उपक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश आयरे, रविंद्र इनामदार, अनुजा पेटकर, देवेंद्र झापडेकर, राजन रहाटे, अशोक पाटील, सुरेश दाते आदी उपस्थित होते. सोमेश्वर येथील शशिकांत सोवनी आणि कुटुंबीयांनी यासाठी पाच एकर १५ गुंठे जागा दान केली व प्रत्यक्ष गाईंचे संगोपन व त्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्था उभे करणे सुरू झाले, असे यावेळी सांगण्यात आले.
शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढले आणि यातूनच अनेक समस्या निर्माण झाल्या. रत्नागिरी शहर परिसरापुरते बोलायचे झाले तर आजूबाजूंच्या गावातील शेती कमी झाली आणि रत्नागिरीत भटक्या गाई गुरांचा वावर वाढायला लागला. आज रत्नागिरीकर म्हणून आम्ही केवळ नैवेद्य दाखवण्यापूर्ती सहानभूती गाईला दाखवतो. या मोकाट गाई वासरांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. गायींना तर लागतेच परंतु अनेक माणसे जखमी होतात. काही समाजकंटक या गायींना कसायाच्या हाती देखील द्यायला कमी करत नाहीत. यावर उपाय म्हणून विश्वमंगल गोशाळा सुरू केली आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
कोकणातील कोकणगिड्डु ही जात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आजच या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर भविष्यात कोकणगिड्ड ही कोकणातील जात नष्ट होईल. कोकणगिड्ड संवर्धनाचे काम आपण सोमेश्वर येथील विश्वमंगल गोशाळेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे सांगण्यात आले.
नगर परिषदेला आवाहन
शहरात सध्या मोकाट गुरांचा प्रश्न खूप गंभीर बनला आहे. ठिकठिकाणी मोकाट गुरांची संख्या दिसत आहे. नगर परिषदेने ही गुरे पकडून आमच्या ताब्यात द्यावीत, आम्ही त्यांचे संवर्धन करू, असे या संस्थेतर्फे सांगण्यात आले.
२८ रोजी होणार गो-पूजन
सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी यांच्यावतीने विश्वमंगल गो-शाळा संगमेश्वर येथे वासुबारस निमित्ताने महाविष्णू वैदीक यज्ञाचे व गो-पूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी गो शाळा शेडचे उद्घाटन, वासरांचा वाढदिवस तर गो-सेवा गतिविधीप्रमुख हरिओम शर्मा, पुरुषोत्तम बाहेती यांचे मार्गदर्शन होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 23/Oct/2024














