◼️ सहकार चळवळीत २५ वर्षांची यशस्वी वाटचाल; कोकण विभागातून ‘तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, पाली’चा गौरव.
पाली/रत्नागिरी: सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरी आणि २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, पाली या संस्थेचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्यामार्फत ‘दीपस्तंभ पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये कोकण विभाग गट क्रमांक २ मध्ये पतसंस्था चळवळीत ‘दीपस्तंभाप्रमाणे’ कार्यरत राहिल्याबद्दल हा मानाचा पुरस्कार पतसंस्थेला प्रदान करण्यात आला.
राज्याच्या सहकार चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. राज्य फेडरेशनचे अध्यक्ष श्री. काकासाहेब कोयटे आणि कर्नाटक राज्य फेडरेशनचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर सी.एस. यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार तक्षशिला पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे यांनी स्वीकारला.
पतसंस्थेची २५ वर्षांतील प्रगती:
तक्षशिला पतसंस्थेने गेल्या २५ वर्षांत १० हजार सभासदांचा टप्पा ओलांडला आहे. संस्थेच्या ठेवी १८ कोटींवर पोहोचल्या असून, या आर्थिक वर्षात ५० कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सभासद, भागभांडवल, ठेवी, गुंतवणूक, कर्जे आणि खेळते भांडवल यात संस्थेने भरघोस वाढ केली आहे. सहकार खात्याचे सी.डी. रेशो, सी.आर.आर., एस.एल.आर. चे आदर्श प्रमाण संस्थेने वेळोवेळी राखले आहे आणि सातत्याने ‘ऑडिट वर्ग अ’ कायम ठेवला आहे.
आधुनिक सुविधांचा ग्राहकांना लाभ:
स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि सभासदांचे हित जपण्यासाठी पतसंस्थेने अत्याधुनिक सुविधा ग्राहकांच्या सेवेत दिल्या आहेत. यामध्ये ग्राहकांसाठी विविध योजना, बचत ठेवी, ग्रामीण भागात सुविधा, एटीएम, अधिकृत वीज बिल भरणा, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, एस.एम.एस. बँकिंग आणि क्यूआर कोड सुविधांचा समावेश आहे.
यापूर्वी संस्थेला ‘बॅंको ब्ल्यू रिबन पुरस्कार’ तीन वेळा मिळाला आहे, आणि आता पुन्हा राज्य फेडरेशनकडून ‘दीपस्तंभ पुरस्कार’ मिळाल्यामुळे संस्थेच्या यशात आणखी भर पडली आहे.
नेत्यांकडून अभिनंदन:
संस्थेला हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. डॉ. उदयजी सामंत, ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत, आमदार भैया सामंत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामभाऊ गराटे यांनी मोबाईलद्वारे संस्थेचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 13-10-2025








