खेड : खेड नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ असलेली कर्मचारी वसाहत सध्या अत्यंत जीर्णावस्थेत असून, नगरपालिकेतील सफाई कर्मचारी आणि तळागाळातील कामगार अत्यंत असुरक्षित परिस्थितीत राहत आहेत. शहराची स्वच्छता राखणारे आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे कर्मचारी स्वतः मात्र जीवघेण्या घरांमध्ये दिवस काढत आहेत, अशी संतापजनक परिस्थिती आहे.
या वसाहतीतील घरांची अवस्था पाहता, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. भिंतींना पडलेले तडे, गळणारे छप्पर आणि कोसळणारे प्लास्टर ही त्यांच्या आयुष्याची रोजची कहाणी बनली आहे. अनेक घरांमधील छप्पर इतके जीर्ण झाले आहे की, पावसाळ्यात पाणी गळतीमुळे राहणे अशक्य होते. तरीसुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
सफाई कर्मचारी, गटारी स्वच्छ करणारे, रस्त्यांवर झाडू मारणारे आणि नगरपालिकेतील तळागाळातील कामगार या वसाहतीत वास्तव्यास आहेत. शहरासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सुरक्षित निवासस्थान न मिळणे ही प्रशासनाची मोठी बेपर्वाई असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
“नगरपालिकेचे कर्मचारी स्वतः मरणाच्या छायेत राहतात आणि तरीही शहर स्वच्छ ठेवतात. तातडीने छप्पर दुरुस्त करून या कर्मचाऱ्यांना सुरक्षित निवास मिळाला पाहिजे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल,” असा इशारा खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष रवीउदय जाधव यांनी दिला आहे. या स्थितीबद्दल स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खेड नगरपालिकेने तात्काळ तांत्रिक पाहणी करून या वसाहतीची दुरुस्ती किंवा पुनर्बाधणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा कर्मचारी संघटना आणि सामाजिक संस्था पुढील काळात मोठे आंदोलन उभारतील, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 13/Oct/2025














