Sangameshwar : कडवई येथील खून प्रकरणातील संशयित महिलेला सशर्त जामीन मंजूर

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे दागिन्यांसाठी वृद्ध महिलेचा खून केल्याच्या अत्यंत गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी हाजिरा मुसा माखजनकर (वय ७२, रा. कडवई) यांना रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

कडवई येथील बानू फकीर मोहम्मद जवळे यांचा खून झाल्याचा गुन्हा संगमेश्वर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी हाजिरा माखजनकर, रिजवान महामुद जुवळे आणि हुमायु शकील काझी (रा. संगमेश्वर) या तिघांविरुद्ध खुनाचा आरोप ठेवला आहे. २ मे २०२५ रोजी संशयित आरोपींनी बानू जवळे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने त्यांचे चारचाकी वाहनातून अपहरण केले. नंतर गळा आवळून त्यांचा निघृण खून केला,असे गुन्ह्यात नमूद आहे.

खुनानंतर बानू यांचा मृतदेह कडवई ते कुंभारखाणी बुद्रुक रस्त्यावरील खिंडीत जंगलमय भागात फेकून देण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली होती. त्यापैकी हाजिरा माखजनकर यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. उन्मेष मुळे यांनी, आरोपी हाजिरा या ७२ वर्षांच्या वृद्ध आहेत आणि त्यांचा या गुन्ह्याशी कोणताही थेट संबंध नाही. त्यांच्याविरुद्ध कोणताही प्रथमदर्शनी पुरावा नसल्याचे अॅड. मुळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

या प्रकरणी दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार मलिकार्जुन अंबाळकर यांनी हाजिरा माखजनकर यांना सशर्त जामीन मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 13/Oct/2025