◼️चार दिवसीय फेस्टमध्ये नाविन्यपूर्ण वस्तूंवर ग्राहकांच्या उड्या; आयोजनाचे सर्वत्र कौतुक, आता वेध जानेवारीतील ‘व्युमेन्स कार्निव्हल’चे.
➡️ रत्नागिरी : ‘रत्नागिरी खबरदार’ आयोजित दिवाळी शॉपिंग फेस्टची १२ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात आणि विक्रमी गर्दीत सांगता झाली. ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान शहरातील जयेश मंगल पार्क येथे पार पडलेल्या या फेस्टने गर्दीचे आणि खरेदीचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. नाविन्यपूर्ण वस्तू, दर्जेदार उत्पादने आणि आकर्षक स्कीम्समुळे रत्नागिरीकरांनी या प्रदर्शनाला अक्षरशः डोक्यावर घेतले. सहभागी महिला उद्योजकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि ग्राहकांचा प्रचंड उत्साह हे या फेस्टच्या यशाची पावती देणारे ठरले.
▪️ग्राहकांसाठी ठरली पर्वणी, खरेदीचा महापूर
यावर्षीच्या दिवाळी शॉपिंग फेस्टमध्ये ग्राहकांचा उत्साह सुरुवातीपासूनच शिगेला पोहोचला होता. केवळ निवडक ६० महिला उद्योजकांचे स्टॉल्स असल्याने ग्राहकांना अत्यंत दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण वस्तू एकाच छताखाली उपलब्ध झाल्या. अनेक ग्राहकांनी “इतर प्रदर्शनांमध्ये नेहमी तेच तेच स्टॉल्स आणि त्याच वस्तू पाहायला मिळतात, त्यामुळे खरेदीचा उत्साह राहत नाही,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, ‘खबरदार’च्या फेस्टमध्ये मिळालेल्या नाविन्यपूर्ण वस्तूंमुळे काही ग्राहकांनी “यापूर्वी इतर ठिकाणी केलेल्या खरेदीचा पश्चात्ताप होत आहे,” अशी भावनाही बोलून दाखवली.
या फेस्टमध्ये झालेल्या खरेदीने तर सर्वांनाच चकित केले. लाखो रुपयांची खरेदी करणारे अनेक ग्राहक याठिकाणी दिसून आले. एका स्टॉलवर तर दुसऱ्या दिवशी तब्बल साडेतेरा लाख रुपयांची आणि तिसऱ्या दिवशी अकरा लाख रुपयांची विक्रमी खरेदी झाली. इतकेच नव्हे, तर एका ग्राहकाने एकाच स्टॉलवरून सव्वा लाख रुपयांची इमिटेशन ज्वेलरी खरेदी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यावरून ग्राहकांचा या फेस्टवरील विश्वास आणि वस्तूंचा दर्जा दिसून येतो.
▪️प्रायोजकांचा मोलाचा वाटा आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन
या यशस्वी आयोजनामागे प्रायोजकांचा मोलाचा वाटा होता. ‘जगन्नाथ गंगाराम पेडणेकर’ हे या दिवाळी शॉपिंग फेस्टचे मुख्य प्रायोजक होते. तर ‘प्रमोद ज्वेलर्स’, ‘कोहिनूर फर्निचर’ आणि ‘मोनाझ’ यांनी सह-प्रायोजकांची भूमिका समर्थपणे पार पाडली. त्यांच्या पाठबळामुळेच इतक्या भव्यदिव्य महोत्सवाचे आयोजन शक्य झाले.
चार दिवसांच्या या खरेदीच्या महायज्ञात सहभागी झालेल्या सर्वच महिला उद्योजकांच्या चेहऱ्यावर अभूतपूर्व समाधान दिसत होते. आपल्या उत्पादनांना आणि कलेला मिळालेली विक्रमी दाद पाहून त्या भारावून गेल्या होत्या.
▪️आता प्रतीक्षा ‘व्युमेन्स कार्निव्हल २०२६’ ची
या रेकॉर्डब्रेक यशानंतर आता रत्नागिरीकरांना ‘रत्नागिरी खबरदार’ आयोजित पुढील इव्हेंटचे वेध लागले आहेत. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ८ ते ११ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ‘व्युमेन्स कार्निव्हल २०२६’ च्या प्रतीक्षेत आतापासूनच ग्राहक आहेत. दिवाळी शॉपिंग फेस्टने निर्माण केलेला उत्साहाचा आणि विश्वासाचा पाया आगामी कार्निव्हललाही विक्रमी यश मिळवून देईल, यात शंका नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 14-10-2025














