Rajapur : खरवतेची दिव्यांग अंगणवाडी मदतनीस मानधनाच्या प्रतीक्षेत….

राजापूर : दिव्यांग असूनही दर्जेदार सेवा देणाऱ्या तालुक्यातील खरवते येथील अंगणवाडीवरील मदतनीस शांती चौगुले गेल्या तीन महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. घरातील कर्ती व्यक्ती म्हणून कुटुंबाच्या आर्थिक डोलाऱ्याचा पूर्णपणे भार खांद्यावर असून, तुटपुंजे मानधनही वेळेत मिळत नसल्याने कुटुंबाचा रहाटगाडा चालवायचा कसा असा त्यांच्यासमोर आहे. जुलैपासून रखडलेल्या मानधनाकडे शांती चौगुले यांनी निवेदनाद्वारे पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागासह जिल्हा महिला व बालकल्याण विभागाचे लक्ष वेधले आहे. जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांच्या रखडलेल्या मानधनासह सप्टेंबरमध्ये असे मिळून तीन महिन्यांचे मानधन बँक खात्यात तत्काळ जमा व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

चौगुले या गावातील अंगणवाडीवर मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. अपंग असून हाती घेतलेले सेवेचे व्रत त्या प्रामाणिकपणे बजावत आहेत. मदतनीस म्हणून शासनाकडून मिळणारे मानधन हेच त्यांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. असे असताना त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबणा झाली आहे. मानधनासाठी त्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करण्यासाठी हेलपाटे मारीत आहेत. मात्र, प्रशासनाकडून ठोस उत्तर देण्याऐवजी केवळ मानधन जमा होईल एवढेच ठोकळेबाज उत्तर देऊन बोळवण केली जात आहे.

जुलै, ऑगस्टचे रखडलेले मानधन कधी जमा होणार याच्या माहितीसाठी शांती चौगुले गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पंचायत समितीसह बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. कुठल्यातरी बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील या केवळ आशेवर त्या दिव्यांग असूनही सातत्याने या बँकेत फेऱ्या मारत आहेत. सप्टेंबर संपला असून त्याचेही मानधन मिळालेले नाही. दिव्यांग महिलेने मानधनासाठी आणखीन किती फेऱ्या मारायच्या? प्रशासन याचा गांभीर्याने विचार करणार की नाही ? – दिनेश चौगुले, माजी सरपंच, खरवते

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 14/Oct/2025