दापोली : दापोली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नवभारत छात्रालय येथील सभागृहात आरक्षण जाहीर करण्यात आले.
यावेळी संबंधित प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते. पंचायत समितीसाठी एकूण १२ गण असून, यापैकी ६ गण स्त्रियांसाठी राखीव ठेवले आहेत.
अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी हर्णै गण राखीव ठेवण्यात आले आहे. येथे सर्वच पक्षांना आयात उमेदवारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री गणासाठी गिम्हवणे व कोळबांद्रे गण राखीव झाला आहे. गिम्हवणे गणासाठी माजी सभापतींच्या नेतृत्वाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे, तर कोळबांद्रे गणासाठी नवीन चेहऱ्यांचा शोध पक्षांना घ्यावा लागणार आहे. सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी दाभोळ, बुरोंडी व खेर्डी गण राखीव झाले असून, या ठिकाणी नव्या उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी जुईकर मोहल्ला, पांगरीतर्फे हवेली, टेटवली, जालगाव व पालगड हे गण आहेत. या ठिकाणी अनेक इच्छुकांनी रस दर्शवला असून, विविध पक्षांतर्फे अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी माजी प्रतिनिधी पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, तर काही गणांमध्ये नव्या चेहऱ्यांवर भर दिला जाईल. दरम्यान, आरक्षणाच्या सोडतीमुळे काही विद्यमान पदाधिकारी व माजी सदस्यांची गण आरक्षित झाल्याने त्यांचे पत्ते कट झाले आहेत.
शिवसेना विरूद्ध शिवसेना
या आरक्षणानंतर सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामस्तरावर संपर्क दौरे, बैठका व रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. येत्या काही दिवसांत तालुक्यातील व जिल्ह्यातील प्रमुख नेते विविध बैठका व सभा घेऊन निवडणुकीसाठी दिशा ठरवतील. या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार असला, तरी स्थानिक पातळीवर काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना या पक्षांमध्ये स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 14-10-2025














