रत्नागिरी : शहरानजीकच्या कदमवाडी-मजगाव रस्त्यावर अज्ञात डंपरचालकाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात एका विद्यार्थ्यासह रिक्षाचालक जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. विद्यार्थी रियान सावकार व रिक्षाचालक जाहिदअली अब्दुलरहिम धामस्कर (वय ५०, रा. मजगाव, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.
ही घटना सोमवारी (ता. १३) दुपारी चारच्या सुमारास मजगाव-कदमवाडी रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक जाहिदअली धामस्कर हे रिक्षातून (एमएच-०८-एक्यू-७१६८) विद्यार्थी शोएब सावकार, रियान सावकार, महमद पेवेकर यांना शहरातील मिस्त्री हायस्कूल येथून बसवून रत्नागिरी ते मजगाव असे जात असताना कदमवाडी-मजगाव येथे आले असता मजगावहून रत्नागिरी येणाऱ्या डंपरने रिक्षाला धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षाचालक जाहिदअल्ली धामस्कर व रियान सावकार हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 14/Oct/2025














