Dapoli : किन्हळ येथे चर्चासत्रातून महिलांना सक्षमीकरणाचा संदेश

दापोली : “शेती हा रोजगारीच व्यवसाय असून त्यासाठी शेतकऱ्याने सबब न सांगता येईल त्या अडचणींवर मात करण्यासाठी तोडगा शोधणं गरजेचे आहे.” असे प्रतिपादन विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर यांनी केले. दापोली तालुक्यातील किन्हळ या दत्तक गावामध्ये बचतगटातील महिलांसाठी आयोजित केलेल्या ‘महिला सक्षमीकरण मार्गदर्शन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विस्तार शिक्षण विभागाचे वरीष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. मंदार पुरी, कनिष्ठ संशोधन सहाय्यक सौ. शिल्पा नाईक तसेच गावच्या उपाध्यक्षा सौ. अभिषा येसवारे आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमात त्यांनी प्रश्नोत्तर पध्दतीने महिलांशी चर्चा केली. महिलांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्याा शंका आणि प्रश्न मांडले. या चर्चेदरम्यान त्यांनी महिलांना काही प्रश्न विचारले त्यांची महिलांनी योग्य उत्तरे दिली असता हिच सक्षमीकरणाची ताकद असल्याचे ते म्हणाले.

यावेळी विस्तार शिक्षण विभागाचे वरीष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. मंदार पुरी यांनीही यावेळी महिलांनी स्मार्ट फोनचा वापर करून बाजारभाव, शासकीय योजना, यांचा अभ्यास करावा असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

कार्यक्रम संपल्यानंतर सौ. अंजली रेवाळे यांच्या परसबागेला भेट देण्यात आली. त्यावेळी त्यांनी “परसबागेसाठी भाजीपाला बियाणे मला विस्तार शिक्षण विभागाकडून मिळाले असून त्याचा मला प्रत्यक्ष खूप फायदा झाला. सदर भाजीपाला मी माझ्यापुरताच न ठेवता शेजारी आणि मुंबईला माझ्या नातेवाईकांना देखील पाठवला.” असे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. शिल्पा नाईक यांनी केले. सदर कार्यक्रम हा विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख, डॉ. संतोष वरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सशस्वी होण्यासाठी डॉ. मंदार पुरी, सौ. शिल्पा नाईक, अभिजीत उमराणे, दृकश्राव्य चालक श्रीयश पवार, वाहन चालक सर्वेश मोहिते यांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 14/Oct/2025