चिपळूण : ग्रामविकास विभागाने राज्याच्या ग्रामीण भागातील वस्त्यांची आणि रस्त्यांची जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित केली आहे. चिपळुणातूनही नावात बदलाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र, काही ग्रामस्थांनी नावात बदलाचा प्रस्ताव नाकारला असल्याची माहिती गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांनी दिली.
कोकण विभागात सर्रासपणे जात व आडनावावरून वाडीचे, रस्त्याचे किंवा वस्त्यांची नावे ठेवली जातात. मात्र, आता सामान्य प्रशासन विभागाकडून गावाचे नाव बदलण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक आहे. हा ठराव गटविकास अधिकारी जिल्हा परिषदेकडे सादर करतील. त्यानंतर तो जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन त्याला मान्यता दिली जाणार आहे.
काही गावांनी नाव बदलाचा प्रस्ताव स्वीकारला असून, त्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र, काही गावांनी या नाव बदलाच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. त्यामुळे त्यांचे प्रस्ताव आलेले नसल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील वस्त्यांची आणि रस्त्यांची जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची कार्यपद्धती चिपळुणातही सुरु झाली आहे. त्याप्रमाणे काही वाड्या व वस्त्यांच्या नावात बदल करण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत. काही ग्रामस्थांनी नाव बदलाचे प्रस्ताव स्वीकारले आहेत, तर काहींनी ते नाकारले आहेत- उमा घार्गे-पाटील, गटविकास अधिकारी, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 14/Oct/2025














