Mahavitaran : वीज कंत्राटी कामगार संघाची १६ ऑक्टोबर रोजी बैठक

रत्नागिरी : वीज कंपन्यांच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या आठवड्यात तीन दिवसीय संप पुकारला होता. या संपाला वीज कंत्राटी कामगार संघाने काळ्या फिती लावून पाठिंबा दिला होता. आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी महावितरणकडून वीज कंत्राटी कामगार संघाची बैठक गुरुवार दि. १६ ऑक्टोबर रोजी संचालक राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे पत्र महावितरणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांनी संघटनेला दिले आहे.

हरियाणा पॅटर्नचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर सादर करावा, दिवाळीपूर्वी वेतनवाढीच्या फरकाची रक्कम, वेतन व बोनसची रक्कम देण्यात यावी, भरती व पुनर्रचनेनंतर कंत्राटी कामगारांना कमी करू नये, कोर्ट केसमधील नावे संपर्क पोर्टलला संरक्षित कामगार म्हणून अधोरेखित करावीत, कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच रहावेत, लास्ट इन फर्स्ट आऊट म्हणजेच LIFO पद्धती वापरावी व अन्य महत्त्वाच्या मुद्यांवर दि. १६ ऑक्टोबर रोजी चर्चा होणार आहे. या बैठकीत रास्त चर्चा न झाल्यास डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आंदोलनाचा इशारा, अध्यक्ष नीलेश खरात यांनी दिला आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेऊन योग्य तोडगा काढून त्यांच्या खात्यातील कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस व भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष जयेंद्र थुळ यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 14/Oct/2025