चिपळूण : चिपळूणचे ग्रामदैवत श्री देव जुना कालभैरव ट्रस्ट व विघ्नहर्ता ग्रुप यांच्या माध्यमातून मंदिरासमोरील पटांगणावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी पाचशे जांभा दगडांचा वापर केला जाणार आहे. २५ फूट लांब, २० फूट रुंद व ५ फूट उंच अशा प्रतिकृतीच्या उभारणी कामात विघ्नहर्ता ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे.
दिवाळी हा सण-उत्सवांचा राजा म्हणून ओळखला जातो. याच कालावधीत गेली अनेक वर्षे किल्ला प्रतिकृती बांधण्याची परंपरा सुरू आहे. शाळेला दिवाळीची सुट्टी लागल्यावर दिवसभर दगड, मातीत हात घालत असतात. आपापल्यापरीने व कल्पकतेने दगड-मातीला किल्ल्याचा आकार देत त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने सुशोभीकरण करून मावळे उभे केले जातात. आता हीच परंपरा सार्वजनिक स्वरूपाची होऊ लागली आहे. भव्य आणि मोठ्या आकारात प्रत्यक्ष महाराजांचे वास्तव्य असलेल्या किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती उभारण्याचे काम आता मंडळांकडून हाती घेण्यात येत आहे. त्यानुसारच चिपळुणातील विघ्नहर्ता मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण हुबेहूब प्रतिकृती साकारण्यास सुरुवात केली आहे. यासाठी ५०० जांभा, दोन ट्रक मातीचा वापर केला जाणार आहे. कोकणात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 23/Oct/2024












