संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैशांच्या हव्यासापोटी एका मुलाने आपल्या ८० वर्षीय वृद्ध वडिलांचे अपहरण करून त्यांच्याच जीविताचा सौदा करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही घटना मंगळवारी, १४ ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीस आली. संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील चोरपऱ्या परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय मराठे (वय ८०) यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशांवरून त्यांचा मुलगा श्रीकांत नेहमीच वाद घालत असे.
सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास श्रीकांतने घरातच आई आणि नातीसमोर वडील दत्तात्रय यांच्या मानेवर सुरा ठेवून एक लाख रुपयांची मागणी केली. “पैसे द्या नाहीतर ठार मारतो,” अशी धमकी देत त्याने वडिलांना जबरदस्तीने कपडे घालायला लावले आणि दुचाकीवर बसवून सह्याद्रीनगरच्या दिशेने पळवून नेले.
व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून खंडणीची मागणी
रात्रभर वडिलांशी संपर्क न झाल्याने मराठे कुटुंबीय चिंतेत होते. मंगळवारी सकाळी श्रीकांतने वडील दत्तात्रय यांच्या मोबाईलवरून नात वेदांगीच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल केला. यावेळी त्याने वडिलांचे हात-पाय आणि तोंड प्लास्टिक टेपने घट्ट बांधलेला एक फोटो पाठवला. या फोटोसोबत त्याने एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. “पैसे न दिल्यास मी आता मागे हटणार नाही,” अशी धमकीही त्याने दिली.
आईच्या धाडसामुळे मुलगा गजाआड
या धक्कादायक प्रकारानंतर श्रीकांतची आई आणि दत्तात्रय मराठे यांच्या पत्नी, ७४ वर्षीय सुनीता दत्तात्रय मराठे यांनी धाडस दाखवत देवरूख पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्या मुलाच्या विरोधात फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई सुरू केली. तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांनी आरोपी श्रीकांत मराठे याला चिपळूण परिसरातून ताब्यात घेतले.
देवरूख पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपी श्रीकांत मराठे याच्यावर अपहरण, खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संगमेश्वर तालुक्यात खळबळ उडाली असून, पैशांसाठी मुलाने बापाच्या जीवाशी केलेला खेळ पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे.














