खेड, रत्नागिरी: १५ ऑक्टोबर
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शिक्षणासाठी जवळ राहिलेल्या मुलीसोबतच अश्लील वर्तन केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका स्वयंघोषित महाराजासह दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
भगवान कोकरे महाराज आणि त्याचा सहकारी प्रीतेश प्रभाकर कदम अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. खेड पोलिसांनी दोघांविरोधात भारतीय दंडसंहिता आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धमकावून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी संशयितांकडे राहत होती. याच काळात भगवान कोकरे महाराज याने तिच्यासोबत अनेकदा अश्लील वर्तन केले. तिच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. हा धक्कादायक प्रकार पीडितेने सुरुवातीला एका सदस्याच्या कानावर घातला. मात्र, त्याने तिला मदत करण्याऐवजी उलट धमकावले.
“महाराजांची समाजात आणि राजकारणात मोठी ओळख आहे, त्यामुळे याबद्दल कुठेही वाच्यता करू नकोस,” असे सांगत त्याने तिला गप्प केले. “जर कोणाला काही सांगितले, तर कुटुंबात आणि समाजात तुझीच बदनामी होईल,” अशी भीतीही तिला घालण्यात आली, असे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
कुटुंबीयांच्या धाडसामुळे गुन्हा उघड
संशयितांकडून वारंवार अशाच प्रकारच्या घटना घडू लागल्याने पीडिता खचून गेली होती. अखेर हा सर्व प्रकार तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यांनी मुलीला धीर देत थेट खेड पोलिस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराविरोधात तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखवले. कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही संशयितांना अटक केली.
या प्रकरणाला रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, “पीडित मुलीवरील अत्याचार प्रकरणी पोक्सोंतर्गत दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी कोकरे महाराज यांना अटकही केलेली आहे.”
या गंभीर प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलिस करत आहेत. एका स्वयंघोषित महाराजाचे असे संतापजनक कृत्य समोर आल्याने तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.














