खाकी वर्दीतील स्त्री शक्तीच्या आरोग्याची काळजी! रत्नागिरीत भाजपा महिला मोर्चातर्फे पोलीस भगिनींसाठी विशेष आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

रत्नागिरी: ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अर्थपूर्ण घोषवाक्याखाली, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला भगिनींसाठी एका विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे तसेच शहराच्या सचिव सौ. कामना बेग यांच्या पुढाकाराने प्रभाग क्र. ८ येथील रत्नागिरी पोलीस मुख्यालयात हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला.

सततच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण कर्तव्यामुळे अनेकदा महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. हीच गरज ओळखून महिला पोलिसांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या दातांची तपासणी, गर्भाशय तपासणी तसेच कर्करोगाविषयी विशेष मार्गदर्शन अशा विविध तपासण्यांची मोफत सोय करण्यात आली होती. पोलीस सेवेतील अनेक महिला कर्मचाऱ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घेतला.

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन आणि कौतुकाची थाप

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पोलीस उपअधीक्षक सौ. फडके मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. बगाटे साहेब यांनीही शिबिराला सदिच्छा भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली व आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले.

याप्रसंगी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे, सरचिटणीस नुपुरा मुळ्ये, शहर अध्यक्षा सौ. भक्ती मनोर दळी, ओबीसी शहर अध्यक्षा सोनाली केसरकर, सौ. कामना बेग, शहर खजिनदार शोनाली आंबेरकर, तालुकाध्यक्ष सुचिता नाचणकर यांच्यासह अनुश्री आपटे, प्रणाली रायकर, प्रज्ञा टाकळे, अनुष्का शेलार, सिया घाग, आणि राधिका आपटे यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस दलातर्फे भाजपा महिला मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.

पोलीस अधीक्षक बगाटे साहेब तसेच उपअधीक्षक फडके मॅडम यांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “कर्तव्य बजावताना महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत, महिलांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे.” त्यांनी या महत्त्वपूर्ण आयोजनाबद्दल सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक आणि सकारात्मक वातावरणात पार पडला. या शिबिराचे यशस्वी आयोजन सौ. वर्षा परशुराम ढेकणे, सौ. कामना बेग, श्री. प्रशांत घाणेकर (बुथ प्रमुख) आणि श्री. अमेय मसुरकर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 15-10-2025