कुवारबाव झोपडपट्टीवासीयांचा वर्षांपासूनचा वनवास संपणार! भाजपच्या पाठपुराव्याला मोठे यश; सहा दिवसांत जागेसह घरे देण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

रत्नागिरी : कुवारबाव येथील ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक चारमधील झोपडपट्टी धारकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला घरांचा आणि जागेचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रश्न पुढील सहा दिवसांत निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत, ज्यामुळे रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

स्थानिक प्रतिनिधी आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनुश्री आपटे यांनी या गरीब झोपडपट्टी धारकांच्या जागेचा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. त्यांच्या या लढ्याला भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षाताई ढेकणे यांनी बळ देत हा विषय थेट राज्य पातळीवर नेला. या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी दिनांक ११ ऑक्टोबर रोजी मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला.

या महत्त्वपूर्ण बैठकीला स्वतः मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण, महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, मत्स्य व बंदर विकास मंत्री श्री. नितेशजी राणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार मा. नारायणराव राणे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. सविस्तर चर्चेअंती, महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सदर झोपडपट्टी धारकांचा प्रश्न तातडीने, म्हणजेच पुढील सहा दिवसांत, ‘आहे त्याच जागी’ घरे आणि जागा देऊन मार्गी लावावा, असे स्पष्ट निर्देश दिले. याकामी प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांचे मुख्य सचिव श्री. अनिकेत पटवर्धन यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

या निर्णयाच्या तातडीच्या अंमलबजावणीसाठी आज भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. यापूर्वीच सदर बैठकीतील निर्णयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले होते. आजच्या चर्चेवेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, जिल्हा उपाध्यक्षा अनुश्री आपटे, कोषाध्यक्ष (मध्य मंडल) दिपक आपटे, शहराध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, निलेशजी आखाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महसूल मंत्र्यांच्या या थेट निर्देशामुळे कुवारबाव येथील गरीब कुटुंबांच्या डोक्यावर हक्काचे छत येण्याची आशा पल्लवित झाली असून, भाजपच्या स्थानिक आणि जिल्हा नेतृत्वाने केलेल्या या यशस्वी पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 15-10-2025