राजापूर : राजापूर तालुका परिसरात गेले काही महिने होत असलेल्या चोऱ्यांच्या तपासात पोलीस प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. मात्र आता दुचाकी चोऱ्यांच्या सिलसिल्यानंतर चोरटयांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा ग्रामीण भागातील बंद घरांकडे वळविला आहे. नाटे सागरी पोलीस स्थानकाच्या हाद्दीतील नाणार धनगरवाडी येथील तीन व कुंभवडे हरचेलीवाडी येथील दोन अशा पाच घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रूपये ४० हजार व एक दहा हजार रूपये किमतीची दुचाकी असा सुमारे ५० हजाराचा मुद्देमाल लांबविला आहे.
सोमवारी १३ ऑक्टोबर रात्री ६ ते १४ ऑक्टोबर सकाळी ८ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. अशा प्रकारे एका भागात पाच बंद घरे फोडल्याने एकच खळबळ उडाली असून ग्रामीण भागातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी सुहास भगवान मणचेकर रा. कुंभवडे हरचेलीवाडी यांनी नाटे पोलीसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून नाटे पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बंद घराच्या दरवाजांच्या कुलुपांवर दगड टाकून ती कुलूप तोडून चोरटयांनी आत प्रवेश करत ही चोरी केली आहे.
नाणार धनगरवाडी येथील गणपत वरक, प्रकाश वरक व अन्य एक अशा तीन जणांची बंद घरे चोरटयांनी फोडली आहेत. तर कुंभवडे येथील सुहास मणचेकर, वैशाली मयेकर यांची घरे फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला आहे. यात गणपत वरक यांच्या घरातील कपाटातील रोख ४० हजार रूपये तसेच एक दहा हजार रूपये किमतीची दुचाकी चोरटयांनी लांबविल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. तर घरातील साहित्याची नासधूसही चोरटयांनी केली आहे.
या प्रकरणी नाटे पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तर श्वान पथकाला पाचारण करून मागही काढण्यात आला आहे. मात्र या चोरी प्रकरणी तपासात कोणतेच यश आलेले नाही. यापुर्वी नाणार, पाळेकरवाडी येथील सुरेश मरतु प्रभू यांच बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे 11 हजार रूपये किंमता स्मार्ट टिव्ही स्मार्ट टीव्ही चोरून नेला होता. या प्रकरणीही पोलीसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. दोन दिवसाच्या फरकाने पुन्हा याच भागात चोरी झाल्याने ग्रामीण भागातील जनतेमध्ये काहीसे भितीचे वातावरण आहे. राजापूर तालुक्यात यापुर्वी कोंडये येथे पाच बंद घरे फोडून झालेल्या चोरीचा अद्याप तपास लागलेला नाही. तर तीन दुचाकींची चोरी राजापुरातुन झालेली आहे. अशा प्रकारे वारंवार होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे पोलीसांपुढे या चोऱ्यांच्या तपासाचे आव्हान ठाकले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 15/Oct/2025














