Chiplun : मांडकी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची परसबाग विविध लागवडीने बहरली

असुर्डे : चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील जिल्हा परिषदेच्या श्री नेटकेश्वर विद्यामंदिर क्रमांक १ शाळेत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत शाळेच्या परिसरात परसबाग तयार करण्यात आली आहे. यावर्षीही परसबागेत विविध प्रकारच्या देशी वाणांच्या फळभाज्या आणि पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे.

परसबागेत वांगी, भेंडी, चवळी, मुळा, मिरची, वालपापडी, तूर, हळद, दोडका, पडवळ, काकडी आणि झेंडू यांसारख्या फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. या सर्व भाज्यांचा शालेय पोषण आहारात नित्य समावेश केला जातो.

बीजांकुरापासून फळधारणेपर्यंत बागेचे निरंतर निरीक्षण केले जाते. या उपक्रमात आंबा, काजू नारळ यांसारख्या फळझाडांसोबत कोरफड, तुळस, दूर्वा, अडुळसा यांसारख्या औषधी वनस्पतींचीही लागवड करण्यात आली आहे.

परसबागेच्या व्यवस्थापनासाठी कृषी सहायकांकडून मार्गदर्शन केले जात आहे. तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारीही या उपक्रमात सहभागी होतात सावर्डे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सशाली मोहिते, केंद्रप्रमुख कवितके, मुख्याध्यापक अशोक भुवड, पदवीधर शिक्षक विशाल शिरकांडे, शिक्षिका प्रबोधिनी कदम व सुषमा शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

सेंद्रिय शेतीचा वापर
या परसबागेत सेंद्रिय शेतीचा वापर केला जात आहे. त्यासाठी कंपोस्ट खत, गोमूत्र, जीवामृत व इतर नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 15/Oct/2025