रत्नागिरी : शेती उत्पादनात जमीन व पाणी दोन्ही महत्त्वपूर्ण घटक आहेत. दोन्हींचा योग्य समतोल असेल, तर उत्पादन वाढते. रासायनिक खतांचा अतिवापर, एकच पीकपद्धती यामुळे जमिनीचे आरोग्य खालावत आहे. आरोग्य निदान करण्यासाठी माती परीक्षण गरजेचे आहे. आता माती परीक्षणासाठी माती पाठविण्याकरिता पोस्टानेही सुविधा उपलब्ध केली आहे. शेतकऱ्यांना माती परीक्षणाचा अहवालही घरबसल्या मिळणार आहे.
शेती मातीचा नमुना तपासल्यानंतर अहवालातून जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक, क्षारता, जमिनीतील सेंद्रिय कर्ब, स्फुरद, पालाश, नत्र, लोह, तांबे, जस्त, बोरॉन व गंधक या पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्याचे प्रमाण समजते. माती परीक्षणानंतर जमीन सुधारण्याच्या व पुढे घेण्यात येणाऱ्या पिकांच्या गरजेनुसार समतोल राखण्यासाठी खतांच्या शिफारसी देणे सुलभ होत आहे. जमीन क्षीण व आजारी असल्यास खतांना प्रतिसाद मिळत नाही त्यावेळी रासायनिक खतांच्या वापराबरोबर सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जीवाणू खते, नत्रयुक्त अझोलासारखी हरित खते, वनस्पतीची पाने, मुळे, धसकटे, पालापाचोळा, काडीकचरा, टाकाऊ पदार्थ चक्रीकरणातून खतांचा समतोल साधता येतो. जमीन क्षीण व आजारी झाल्याने खतांना प्रतिसाद देत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून अपेक्षित मोबदला मिळत नाही. यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. त्यानंतर उपाययोजना करणे शक्य होते. माती परीक्षणासाठी स्वतः शेतकऱ्यांना माती प्रयोगशाळेत न्यावी लागत होती. आता पोस्टाने माती परीक्षणासाठी पाठविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे घरबसल्या माती परीक्षणाचा अहवाल शेतकऱ्यांना मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:25 PM 23/Oct/2024














